प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी इगतपुरी तालुका किसान सभेच्या वतीने गुरूवारी रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देविदास आडोळे व चंदू लाखे यांनी दिली.
दुष्काळाला तोंड देण्यासाठी पाणी, चारा, रोजंदारी, रेशन आदिंची व्यवस्था, वनाधिकार कायद्याची तातडीने अंमलबजावणी, पात्र दावेदाराच्या ताब्यात असलेली चार हेक्टर पर्यंतची जमीन नावावर करणे, अपात्र दावेदाराचे ज्येष्ठ नागरिकांचे जबाब हे पुरावे असतील तर त्या सर्व दावेदारांचे दावे पात्र करावेत, देवस्थान, गायरान, सरकारी पडीत जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात, सर्व शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर भाव द्यावा, एपीएल आणि बीपीएल हा भेद नष्ट करून प्रत्येक कुटुंबाला दोन रुपये किलो दराने गहू व तांदूळ द्यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
शासनाने वनजमिनी अद्यापही ताब्यात दिली नसून ही जमीन ताब्यात मिळावी म्हणून किसान सभेने अनेकदा आंदोलन करूनही त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. शासन जमीनधारकांची दिशाभूल करीत असून ही जमीन ताब्यात देण्यात टाळाटाळ करीत आहे.
जमीन देण्यासाठी स्थानिक वनाधिकाऱ्यांस अधिकार दिल्याने हे प्रकरण प्रलंबित राहत आहे. त्यामुळे वनजमिनींचा त्वरीत ताबा द्यावा, टंचाईग्रस्त भागात शासनाने मूलभूत सुविधा द्याव्यात अशी मागणीही किसान सभेने केली आहे. या मागण्यांसाठी घोटी-वैतरणा रस्त्यावरील वाहतूक रोखून धरण्यात येईल. त्यामुळे सर्व शेतकरी शेतमजूर कामगारांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन किसान सभेच्या वतीने करण्यात आले आहे.

Story img Loader