दुष्काळग्रस्तांसाठी पाणी, चारा व रोजगाराची उपलब्धता करावी यासह इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ईगतपुरी तालुका किसान सभेच्यावतीने घोटी-वैतरणा मार्ग सुमारे पाच तास रोखून धरण्यात आला.
किसान सभेचे देविदास आडोळे, चंदू लाखे, अप्पा भोले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. सध्या नाशिकसह राज्यातील अनेक भागात दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
या पाश्र्वभूमीवर, शासनाने शेतकऱ्यांना पाणी व रोजगार तसेच गुरांसाठी चाऱ्याची उपलब्धता करावी, वनाधिकार कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी, पात्र दावेदारांच्या ताब्यात असलेली चार हेक्टर पर्यंतची जमीन नांवावर करावी, अपात्र दावेदारांचे ज्येष्ठ नागरिकांचे जबाब हे पुरावे असतील तर ते पात्र करावे, देवस्थान, गायरान, सरकारी पडीत जमिनी कसणाऱ्यांच्या नांवे कराव्यात या मागण्या करण्यात आल्या. शेतमालास उत्पादन खर्चावर आधारीत किफायतशीर भाव द्यावा आणि एपीएल व बीपीएल हा भेद नष्ट करून प्रत्येक कुटुंबाला दोन रूपये दराने गहू व तांदुळ द्यावे, या मागण्यांसाठी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार गोविंद शिंदे व पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांना दिले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा