भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात आज तालुक्यातील टाकळीभान येथे रास्ता रोको करण्यात आला. सुमारे ४० मिनिटे सुरू असलेले आंदोलन नायब तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर मागे घेण्यात आले. यावेळी कामगार तलाठी सुनील पाटील, पोलीस उपअधीक्षक अंबादास गांगुर्डे, निरीक्षक कैलास पुंडकर उपस्थित होते.
माजी सभापती नानासाहेब पवार म्हणाले की, निळवंडे धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय चुकीचा असून या निर्णयास माजी मंत्री बाळासाहेब विखेंनीसुद्धा विरोध केला आहे. जायकवाडी धरणात पाणी सोडले तर आपल्या भागाला पाणी मिळणार नाही. परिणामी बंधारे, गावतळे कोरडे राहतील आणि आपल्या भागाचे वाळवंट होईल. आमचे हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे, या पाण्यातून प्रथम प्रवरा नदीवरील बंधारे, गावतळे, टाकळीभान टेलटँक भरण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. उपसरपंच भारत भवार, प्रा. दिलीप कोकणे, राजेंद्र कोकणे, भाऊसाहेब दाभाडे, चित्रसेन रणनवरे, नवाज शेख आदींची यावेळी भाषणे झाली. या दरम्यान श्रीरामपूर-नेवासे रस्त्यावर दुतर्फा वाहनांची मोठी कोंडी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा