सरकारने जाहीर केलेल्या हमी भावाप्रमाणे तुरीची खरेदी सुरू करावी, उसाला प्रतिटन २ हजार २५० रुपये भाव द्यावा, यासह अन्य शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना परभणी तालुका शाखेच्या वतीने गुरुवारी (दि. १०) वसमत मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच शाळा-महाविद्यालय परिसरात व बसस्थानकात पोलिसांचे फिरते पथक कार्यरत करून युवती व महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी पाथरी तहसील कार्यालयावर आमदार मीरा रेंगे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे.
सेना सहसंपर्कप्रमुख प्राचार्य शिवाजी दळणर, जिल्हाप्रमुख सुधाकर खराटे, खासदार गणेश दुधगावकर, आमदार संजय जाधव, उपजिल्हाप्रमुख अजित वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली सेनेतर्फे गुरुवारी सकाळी ११ वाजता वसमत रस्त्यावरील वरद गार्डनसमोर रास्ता रोको आंदोलन होणार आहे. आंदोलनात शेतकऱ्यांसह शिवसैनिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तालुकाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव आदींनी केले आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघात पाथरीसह मानवत, सोनपेठ शहरांत शाळा, महाविद्यालयीन युवतींना छेडछाडीस सामोरे जावे लागत आहे. या घटनांना त्वरित आळा घालण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात. सर्वच बसस्थानकांत कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करावी. महिला पोलिसांच्या चिडीमार पथकांची संख्या वाढवावी, अशा मागण्यांसाठी विद्यार्थिनी व महिलांचा पाथरी तहसीलवर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे नेतृत्व आमदार मीरा रेंगे करणार आहेत.