पाथरी व जिंतूर मतदारसंघातील राज्य महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवर कोटय़वधीचा खर्च करूनही प्रत्यक्षात या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांच्या दुर्दशेमुळे वाहनधारकांसह सारेच त्रस्त झाले आहेत. केवळ डागडुजी न करता आराखडा तयार करून रस्त्यांचे मजबुतीकरण करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा प्रशासनाकडे केली.
पाथरी राष्ट्रीय महामार्ग, जिंतूर महामार्ग तसेच सेलू ते देगाव फाटा, सेलू ते पाथरी, मानवत, पाथरी ते सोनपेठ या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झाल्याने रस्ता केवळ नावालाच उरला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवरचे डांबर वाहून गेल्याने केवळ गिट्टी शिल्लक आहे. राज्य मार्गासोबतच जिल्ह्यातील अंतर्गत रस्तेही खराब झाले आहेत. खराब रस्त्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक गावांत खराब रस्त्यांमुळे वाहनेही जाऊ शकत नसल्याने ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.
रस्त्यांवर दरवर्षी कोटय़वधीचा निधी मिळूनही रस्त्यांची केवळ डागडुजी करण्यात येते. परंतु काम झाल्यावर महिनाभरातच रस्ते पुन्हा उखडले जातात. यातून कंत्राटदारा खिसेच तेवढे भरले जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत रस्त्यांची वाट लागली आहे. गतवर्षी रस्त्यांची निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून या पाच तालुक्यांसाठी आराखडा तयार करावा व रस्त्यांचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली. जिल्हाध्यक्ष शेख राज, बालाजी मुंडे, सचिन पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुशीला चव्हाण, उपाध्यक्ष खंडेराव आघाव आदींच्या या निवेदनावर सह्य़ा आहेत.

Story img Loader