मरिन ड्राइव्ह सुशोभीकरणाचे काम सुरू होऊन आठ महिने उलटल्यावर पालिकेला आता रस्त्याखालच्या सांडपाणी वाहिन्या दुरुस्त करण्याची जाणीव झाली आहे. जुन्या जलवाहिन्यांमुळे रस्ता वारंवार खचत असल्यामुळे संपूर्ण वाहिन्या बदलण्याची गरज असतानाही केवळ प्रकल्पाची किंमत दुप्पट होऊ नये यासाठी दुरुस्तीची मलमपट्टी लावण्याचे ठरवले आहे.  
मरिन ड्राइव्हचा रस्ता १९३९ मध्ये बांधण्यात आला. क्वीन नेकलेस म्हणून प्रसिद्ध असलेला हा रस्ता मुंबईतील सर्वाधिक रहदारीच्या रस्त्यांपैकी एक आहे. आतापर्यंत एकदाही या रस्त्याच्या संपूर्ण पृष्ठभागाची दुरुस्ती शक्य झाली नव्हती. अखेर १२० कोटी रुपये खर्च करून या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे पालिकेने दीड वर्षांपूर्वी ठरवले. मात्र या रस्त्याचे डांबरीकरण अधिक योग्य राहील, असे तज्ज्ञांनी सांगितल्याने अखेर यावर्षी ३१ जानेवारीपासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.  या रस्त्याखाली जलवाहिन्या तसेच सांडपाणी समुद्रात सोडणाऱ्या वाहिन्या आहेत. ब्रिटिशकाळापासून टाकलेल्या या वाहिन्या आता खराब झाल्या असून त्यामुळे अनेकदा हा रस्ता खचल्याच्या घटना घडतात. रस्त्याचा पृष्ठभाग दुरुस्त करण्यापूर्वी त्याखाली असलेल्या वाहिन्या दुरुस्त करणे अधिक सोयीचे होते. मात्र याबाबत पालिकेच्या दोन विभागामध्ये समन्वय साधला न गेल्याने रस्त्याचे काम सुरू होईपर्यंत वाहिन्यांच्या दुरुस्तीबाबत कोणतीही पावले उचलली गेली नाहीत.  गेल्या आठवडय़ात प्रशासनाने गटनेत्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा केली. या रस्त्याखाली असलेली सांडपाणी वाहिनी पूर्ण दुरुस्त करण्याची गरज असतानाही ती दुरुस्ती न करता केवळ काही ठिकाणी ती दुरुस्त केली जाणार आहे. त्यासाठी सात कोटी रुपये स्थायी समितीत मंजूर झाले. संपूर्ण दुरुस्तीबाबत तसेच जलवाहिन्यांबाबत पालिका कोणताही चकार शब्द काढायला तयार नाही. जलवाहिन्या ठीक असून पाच ते सात वर्षे दुरुस्त कराव्या लागणार नाहीत, असे पालिका अभियंत्यांनी सांगितले. मरिन ड्राइव्हचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी वाहतूक विभागाकडून वारंवार परवानगी मिळणार नाही. त्यामुळे पुढील २५ ते ३० वर्षांंचा विचार करून पालिकेने उपाययोजना करायला हव्यात. जलवाहिन्या व सांडपाणी वाहिन्या दुरुस्त करण्यासाठी साधारण ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पालिका आधीच या रस्त्यासाठी ५७ कोटी रुपये खर्च करत आहे. प्रकल्पाची किंमत दुप्पट होत असल्याने गरज असतानाही पालिका वाहिन्या बदलण्याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करत आहे. मात्र यामुळे पुढच्या पाच ते सात वर्षांतच रस्ता पुन्हा दुरुस्तीला काढावा लागेल, असे समाजवादी पार्टीचे गटनेता व स्थायी सदस्य रईस शेख म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा