जिल्हा पोलीस, उपप्रादेशिक परिवहन, सार्वजनिक बांधकाम विभाग व एस.टी. महामंडळाच्या वतीने उद्यापासून (मंगळवार) १५ जानेवारीदरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे.
जिल्हा पोलीस मुख्यालयात अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. उपअधीक्षक राम हाके, संग्राम सांगळे, महेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. गंभीर अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षा अभियानाची योजना आहे. विद्यार्थ्यांची सायकल रॅली, वाहनचालकांची नेत्र तपासणी, स्कूलबस चालकांना प्रशिक्षण, वाहनचालक, पोलीस व वाहतूक कर्मचारी यांना प्रथमोपचार प्रशिक्षण, महत्त्वाच्या चौकांमध्ये स्लाइड शो, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन व त्यांचा सहभाग आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या पंधरवडय़ात दारू पिऊन वाहन चालविणे, नो पार्किंग, अतिवेगाने वाहन चालविणे, अवैध प्रवासी वाहतूक, वाहनांच्या काचेवर काळी काच लावणाऱ्यांवर केसेस करणार असल्याचे दाभाडे यांनी स्पष्ट केले.
उद्या सलोखा, सुरक्षितता परिसंवाद
यंदा प्रथमच महाराष्ट्र पोलीस ‘रेझिंग डे’ साजरा करणार आहेत. या निमित्ताने बुधवारी जातीय सलोखा व सुरक्षितता परिसंवादाचे आयोजन केले आहे. दि. २ ते ८ जानेवारीदरम्यान शाळकरी मुलांना पोलीस ठाण्याच्या भेटीचे आयोजन करण्यात येणार आहे. या वेळी पोलिसांच्या विविध कारभाराचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले जाणार आहे.

Story img Loader