जिल्हय़ात ठिकठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. प्रमुख जिल्हा मार्ग योजनेतील सर्व रस्त्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी हिंगोलीचे माजी खासदार शिवाजी माने यांनी केली आहे.
जिल्हा परिषद प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की जिल्हय़ात अग्रक्रमाने रस्त्याचे बांधकाम होणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्हय़ात सुमारे ७८७ किलोमीटर प्रमुख जिल्हा मार्गापैकी जिल्हा परिषदेकडे ६८८ किलोमीटर तर सा.बां.कडे केवळ ९९ कि.मी. रस्ते विभागलेले आहेत. १९९७च्या पी. बी. पाटील समितीतील शिफारशीनुसार ज्या रस्त्यावर एक हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त वाहतूक आहे, असे सर्वच रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावेत तसेच इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते हे जिल्हा परिषदेकडे देण्यात यावेत.  जिल्हा परिषदेकडे असणाऱ्या प्रमुख मार्गाची अत्यंत दुरवस्था झालेली असून, या रस्त्याच्या डागडुजीशिवाय इतर कामे तर निधीअभावी प्रलंबित आहेत. त्यामुळे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी खासदार माने यांनी केली आहे.