जालना शहरासाठी थेट जायकवाडीवरून राबविण्यात येणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेस तातडीने वीजजोडणी देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी शहरातील राज्य रस्त्यांवर सहा ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सत्ताधारी काँग्रेसचे स्थानिक आमदार कैलास गोरंटय़ाल यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
नवीन पाणीयोजनेस वीजजोडणी देण्यासाठी वीजबिलाची जुनी ३६ कोटींची थकबाकी भरण्याची अट महावितरणने घातली आहे. या संदर्भात राज्य सरकारनेही असमर्थता व्यक्त केली. सध्या शहरातील तीव्र पाणीटंचाई पाहता तातडीने नवीन योजनेस वीजजोडणी द्यावी, या साठी आमदार गोरंटय़ाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दिवसभर धरणे धरण्यात आले. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून मंगळवारी शहराच्या नाक्यांवर सहा ठिकाणी राज्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे वाहतूक मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाली होती.
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी गोरंटय़ाल यांची मागणी आणि आंदोलनाविषयी चर्चा केली. त्यानंतर ठाकरे यांच्यासोबत त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली आणि या प्रश्नाविषयी चर्चा केली. डोंगरे यांनी सांगितले, की मुख्यमंत्र्यांनी जालना पाणीप्रश्नी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.
उस्मानाबाद व जालना शहरांना सारखा न्याय देण्यासंदर्भात काही तरी गैरसमज झाला असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले.
वीजजोडणीसंदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन देऊन या संदर्भात गोरंटय़ाल यांच्याशीही संपर्क साधणार असल्याचे त्यांनी सांगितले असल्याची माहिती डोंगरे यांनी दिली.

Story img Loader