इंटरनेटच्या सेवेसाठी एका खासगी कंपनीने पनवेल शहरामधील रस्ते भर पावसाळ्यात खोदल्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या कामामुळे नगर परिषदेच्या तिजोरीत सुमारे पावणेपाच कोटी रुपये जमा झाले असले, तरी ऐन पावसाळ्यात खड्डे खोदण्याची परवानगी प्रशासनाने दिलीच कशी, असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. याबाबत कंपनीने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पनवेलकर आधीच शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेने हैराण झाले आहेत. अशातच रिलायन्स जिओ कंपनीने इंटरनेट फोर-जी सेवेसाठी केबल वाहिनी टाकण्यासाठी बिग बझार ते तक्का गाव, साई मंदिर रोड तसेच एनएमएमटी बसथांबा ते रेल्वेस्थानक रोड असे रस्ते खोदण्यास घेतले आहेत. साधारण १३ किलोमीटपर्यंतचे हे रस्ते असून खोदकाम परवानगीसाठी रिलायन्स जिओ कंपनीने नगर परिषदेकडे चार कोटी ८३ लाख रुपये जमा केले आहेत. पावसाळ्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यासाठी रीतसर परवानगी घेण्यात आली आहे, असे कंत्राटदार कंपनीच्या पर्यवेक्षकांनी स्पष्ट केले आहे. यामुळे रहिवाशांनी काही लोकप्रतिनिधी व नगर परिषदेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे. किमान पावसाळ्यामध्ये ही खोदकामे टाळण्यात यावीत, अशी सूचना पनवेलकरांनी लोकप्रतिनिधींकडे केली आहे. पनवेलकरांची मागणी रास्त आणि सभागृहात मांडण्यात आलेली आपली भूमिका चुकीची असल्याची जाणीव काही सदस्यांना निर्माण झाल्यानंतर त्यांनी आता पावसाळ्यातील खोदकाम थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा