महिन्याभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्य़ातील अनेक गावांमधील रस्त्यांची वाट लागली आहे. गेल्या वर्षी कोटय़वधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले डांबरी रस्ते खराब झाले आहेत. रस्ते आणि पुलांची दुरुस्ती व देखभालीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य सरकारकडे शंभर कोटींची मागणी केली आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्य़ातील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. जिल्हा परिषदतेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यानंतर पावसाळ्यापूर्वी गावामधील रस्ते तयार करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर काही गावांमध्ये रस्ते तयार करण्यात आले, मात्र अनेक गावांमधील रस्त्यांची फारच बिकट अवस्था झाल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्यांनी सभागृहात उपस्थित केला. काटोल, कळमेश्वर, रामटेक, मौदा, कुही, उमरेड, पारशिवणी, मांढळ, हिंगणा या गावांमधील रस्ते खराब झाले असून त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. निधी कमी असल्याचे कारण सांगून रस्ते देखभाल व दुरस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामीण भागात चिखल तुडवत जनतेला घरापर्यंतच जावे लागत आहे.  जिल्हा परिषदेने राज्य शासनाकडे रस्ते दुरुस्तीसाठी शंभर कोटी रुपयांची मागणी केल्यानंतर शासनाकडून तूर्तास कुठलाही निधी आला नाही. जिल्हा नियोजन समितीकडेही ४० कोटींची मागणी केलेली असताना ११ कोटी मिळाले आहेत.  निधीअभावी जिल्ह्य़ातील अनेक रस्ते देखभाल व दुरुस्तीपासून वंचित आहेत. शासन निधी देणार नसेल तर देखभाल व दुरस्ती कशी करणार? असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडला आहे. आतापर्यंत आलेल्या निधीचे काय केले ? असा प्रश्न विरोधी पक्षांनी विचारून रस्त्यांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्य़ात ११ हजार कि.मी.चे रस्ते आहेत. या खराब झालेल्या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करावयाची असल्यास जवळपास ४५ ते ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. डांबरीकरण करायचे म्हटल्यास एक कि.मी. रस्त्याला जवळपास ७ ते ८ लाख रुपयांचा खर्च येतो. ग्रामीण भागातील रस्त्यांमध्ये १ हजार ४९१.८३ कि.मी. डांबरी रस्ते आहेत. १ हजार ५६२ कि.मी. रस्त्यांवर खडीकरण करण्यात आले आहे. ५१७ कि.मी. रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला असून ४ हजार ५१९ कि.मी. पांदण रस्ते आहेत. इतर मार्गामध्ये २ हजार ८५९ कि.मी. साधे रस्ते आहेत. १ हजार ४६८ कि.मी. डांबरी रस्ते, ३७० कि.मी.च्या रस्त्यावर खडीकरण, ६४ कि.मी. रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्य़ातील अनेक गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पावसाळ्यापूर्वी काही भागात तयार करण्यात आलेले रस्ते व अनेक पूल खराब झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसोबत या संदर्भात बैठक झाली आहे. जिल्ह्य़ात नुकसानीचा आढावा घेण्यासंदर्भात बांधकाम समितीला निर्देश देण्यात आले. त्यांचा अहवाल आल्यावर तो जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येईल. शासनाकडून रस्ते देखभाली व दुरस्तीसाठी अतिशय कमी निधी येत असल्यामुळे जिल्ह्य़ातील रस्ते कसे दुरुस्त करणार?  असा प्रश्न उपस्थित करून  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गोतमारे यांनी निधीची मागणी केली.

Story img Loader