शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना हे लोण आता ग्रामीण भागातही पसरले आहे. बुधवारी सकाळी यावल तालुक्यातील किनगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भर वस्तीतील शाखेतून दरोडेखोरांनी सुमारे आठ लाखाची लूट केली.
किनगाव येथील बाजार पेठेत स्टेट बँकेची शाखा आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अधिकारी आणि कर्मचारी बँकेत आले. दोन महिलाही त्यावेळी आपले वेतन घेण्यासाठी बँकेत आल्या. बँकेच्या कामाला नुकतीच कुठे सुरूवात होते न होते तोच तोंडावर कापड बांधलेल्या तिघांनी हातात पिस्तुल घेऊन बँकेत प्रवेश केला. त्यांनी आतून दार लावून घेतले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिस्तुलचा धाक दाखवित रोखपालाकडून तिजोरीची चावी घेत लाखो रुपये काढून आपल्या जवळील प्लास्टिकच्या पिशवीत भरले. नंतर सर्वाना दरडावत आले तसे ते निघूनही गेले. बँकेत चहा देण्यासाठी आलेला मुलगाही यावेळी उपस्थित होता. दरोडेखोर मोटर सायकलने मुख्य रस्त्यापासून जवळच असणाऱ्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या राज्य मार्गाकडे गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ते पळून जात असताना बाहेरच्या काही मुलांनी त्यांच्यावर दगड फिरकावल्याचे सांगण्यात येते.
स्टेट बँकेवर दरोडा पडल्याचे वृत्त कळताच पोलिसांनी नाकाबंदी केली. परंतु दरोडेखोर सापडू शकले नाहीत. किनगाव हे यावल तालुक्यातील समृद्ध गाव समजले जाते. दरोडेखोरांनी सुमारे पाच ते आठ लाख रुपयांची लूट केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. बँकेवरील या दरोडय़ामुळे जिल्ह्य़ातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढल्याचे दिसून येत आहे.