एखाद्याचे अपहरण करून कुटुंबियांकडून खंडणी उकळण्याचे प्रकार आपल्याला माहीत आहेत. पण वाहनाचे अपहरण करून ते सोडविण्यासाठी खंडणीचा प्रकार कधी ऐकला आहे? नागपाडा पोलिसांनी अलीकडे अशाच एका मुलुखावेगळ्या खंडणीखोराला अटक केली आहे. तो चक्क मोटारसायकलींचे अपहरण करायचा आणि नंतर त्या सोडविण्यासाठी मालकालाच फोन करून पाच ते दहा हजार रुपयांची खंडणी उकळायचा.
कुरेशी हा भायखळ्याच्या मदनपुरा येथे राहणारा. त्याचा मूळ व्यवसाय भंगार विक्रीचा. त्यात फारसे पैसे मिळत नसल्याने त्याने चोरीचा मार्ग पत्करला आणि मोटारसायकली चोरू लागला. अशातच त्याला एक कल्पना सुचली. कुरेशी काही लोकांवर पाळत ठेवून त्यांचा मोबाईल क्रमांक, आर्थिक स्थिती आदी माहिती घ्यायचा. मग त्याची मोटारसायकल चोरून आडजागी लपवून ठेवायचा. आपली गाडी जागेवर नसल्याचे पाहून मोटारसायकलीचा मालक सैरभैर व्हायचा. शोधाशोध सुरू असताना मग कुरेशी त्याला सार्वजनिक दूरध्वनीवरून फोन करायचा. तुझी मोटारसायकल कुठे आहे, ते मला माहिती आहे. ती जर परत हवी असेल तर ५ ते १० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगायचा. आपली चोरीला गेलेली गाडी दहा हजारात परत मिळते हे ऐकल्यावर तो तयार व्हायचा. पैसे घेताना कुरेशी फिल्मी स्टाईल वापरायचा. एखाद्या निर्जन ठिकाणी विशिष्ट जागेवर पैसे ठेवायला सांगायचा. वाहनमालक पैसे ठेवून निघून गेल्यावर पुन्हा त्याला फोन करून ‘गाडी एका विशिष्ट ठिकाणी पार्क केलेली आहे, तिथे मिळेल’, असे सांगायचा. ठरल्या जागी गाडी मिळायची. पोलिसांकडे तक्रार केली तर गाडी मिळेल याची शाश्वती नाही. दहा हजारात गाडी सुखरूप मिळते तर आहे हे समाधान वाहनचालकाला मिळायचे. कुरेशीचा हा ‘धंदा’ मस्त सुरू होता. पण आपल्याच नातेवाईकाची मोटारसायकल चोरताना तो फसला. त्याने आपल्या चुलत भावाचीच मोटारसायकल शुक्रवारी चोरली. नेहमीप्रमाणे त्याने सार्वजनिक चुलत भाऊ अस्लम याला फोन केला. तुझी गाडी परत हवी असेल तर १० हजार रुपये दे, असे सांगितले. एक अनोळखी माणूस आपल्याच गाडीचे पैसे मागतो याचा संशय येऊन त्याने नागपाडा पोलीस ठाणे गाठले. कुरेशीला पकडण्सासाठी पोलिसांनी सापळा लावला. पैसे घेताना साध्या वेषातील पोलिसांनी कुरेशीला ताब्यात घेतले. फोन करणारी व्यक्ती आपलाच भाऊ आहे, हे समजल्यावर अस्लमला मोठा धक्काच बसला.
कुरेशीकडून आतापर्यंत आम्ही असे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत, अशी माहिती नागपाडय़ाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार मेहतर यांनी दिली. त्याने लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला होता. चोरीला गेलेली मोटारसायकल पोलिसांकडे गेलो तरी परत मिळत नाही. मग जर कुणी ती पाच ते दहा हजारात ती मिळवून देत असेल तर हरकत काय, असा विचार लोक करतात. याचा फायदा कुरेशी घेत होता, असे ते म्हणाले.

Story img Loader