सांगली येथे सात महिन्यांपूर्वी सचिन ज्वेलर्सवर दरोडा टाकल्याच्या प्रकरणी फरार असलेल्या आरोपीस पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीस तोळे सोने व चार किलो चांदी असा अकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ात पूर्वी तीन आरोपींना पुण्यातच अटक करून त्यांच्याकडून ३८ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला होता.
गोपाळ बबन गेडाम (वय ३०, रा. मंगळवार पेठ, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर अमोल ओव्हाळ, परवेज शेख, विजय कोळी यांना या गुन्ह्य़ात अटक करून त्यांच्याकडून एकशे सात तोळे सोने, आठ किलो चांदी असा ३८ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला होता. १३ मार्च २०१२ रोजी ही घटना घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शाकीर जेनेडी यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, सांगली दरोडय़ातील आरोपी हा वल्लभनगर एसटी स्थानकावर येणार आहे. त्यानुसार िपपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन विधाते व त्यांच्या पथकाने सापळा रचून गेडाम याला अटक केली. त्याच्याकडून दरोडय़ातील माल जप्त केला. न्यायालयाने त्याला अधिक तपासासासाठी ३० नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मोहन सावंत, फौजदार अन्सार शेख, पोलीस कर्मचारी हरिचंद्र कदम, शाकीर जेनेडी, सुभाष दांगडे, पाटोळे यांनी सहभाग घेतला.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robber get arrested after in seven month in sangli