डोळ्यात मिरचीची पूड टाकून हातातील रोकड असलेली बॅग हिसकावून घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरटय़ाला नागरिकांनी पाठलाग करून पकडले. त्यास जोडभावी पेठ पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शाहरूख इसाक शेख (वय १९, रा. बुधवार बाजार, साखर पेठ, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरटय़ाचे नाव आहे. नागेश रेवणसिद्ध जावळे (वय २४, रा. कर्णिकनगर, सोलापूर) हे जोडभावी पेठेत मल्लिनाथ आळगुंडी यांच्या यशश्री लॉटरी सेंटर या दुकानात नोकरीस आहेत. रात्री ९.३० वाजता ते लॉटरी दुकान बंद करून हिशोबाची रक्कम बॅगेत भरून सायकलवरून निघाले होते. वाटेत मड्डी वस्तीजवळ एका तरुणाने जावळे यांची सायकल अडवून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली व त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून घेऊन पोबारा करीत असताना जावळे यांनी आरडाओरड केला. त्या वेळी आसपासच्या नागरिकांनी सावध होऊन संशयित चोरटय़ास पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या हवाली केले.   

Story img Loader