श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव येथे खोमणे वस्तीवर आज मध्यरात्री दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. दरोडेखोरांनी येथून ७३ हजारांचे दागिने पळवून नेले. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपींच्या अटकेसाठी संतप्त ग्रामस्थांनी दौंड-नगर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
शंकरराव नामदेव विठेकर (वय ७०) असे दरोडय़ात ठार झालेल्या वृद्धाचे नाव असून त्यांचा मुलगा  दत्तात्रय (वय ३८) याच्यावरही प्राणघातक हल्ला झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर श्रीगोंदे तालुक्यात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. शंकराव विठेकर घरात झोपले असताना मध्यरात्री दरोडेखोरांनी त्यांच्या गेटचे कुलूप तोडले व घरात प्रवेश केला. विठेकर झोपलेल्या खोलीत ते प्रथम गेले. त्यांची चाहूल लागताच शंकरराव जागे झाले, हे पाहताच दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी गजाचा प्रहार केला. त्यात शंकरराव जागीच ठार झाले. त्या आवाजाने शेजारील खोलीत झोपलेला त्यांचा मुलगा दत्तात्रय जागा झाला. परंतु दरोडेखोरांनी त्याच पध्दतीने त्याच्यावर हल्ला केला. त्यात दत्तात्रय गंभीर जखमी झाला.
दरम्यान, दरोडेखोरांनी शंकररावांची पत्नी कुसूम हिला चाकूचा धाक दाखवून कपाट उघडण्यास लावले व त्यातील ७२ हजार ८०० रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. कुसूम यांनी आरडाओरडा केल्याने शेजारी धावून आले. त्यांनी दोघांना रूग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत शंकरराव यांची प्राणज्योत मालवली होती.
श्रीगोंदे शहर व तालुक्यात दोन पोलीस ठाणे असूनही कायदा व सुव्यवस्था चांगलीच ढासळली आहे. अवैध व्यवसाय बोकाळला आहे. पोलिसांचे गुन्हेगारांशी लागेबांधे आहेत, अशी चर्चा नागरिक आता उघडपणे बोलू लागले आहेत. ही घटना बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असली तर तेथेही पोलीस निरीक्षक रजेवर गेले आहेत. पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्याच तालुक्यात पोलीस खात्याची ही अवस्था आहे.