ऐन दिवाळीत चोरटय़ांचे चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, शहरासह ग्रामीण भागातही चोरटय़ांचे धुमाकूळ घालणे सुरू आहे. दौलताबाद-खुलताबाद रस्त्यावरील शरणापूर शिवारात असलेल्या घरात घुसून सात-आठ दरोडेखोरांनी काठय़ांनी कुटुंबप्रमुखास मारहाण केली. या वेळी त्यांच्या घरातून ५८ हजारांचा ऐवज लुटून नेला. छावणी पोलिसांनी याबाबत नोंद केली.
एकनाथ गणपत जायभाय (वय ४९) यांनी फिर्याद दिली. जायभाय हे दर्शनसिंग सोधी यांच्या शेतात (नाथ सीडच्या मागे) राहतात. सोमवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास त्यांच्या घरापुढे कुत्री भुंकू लागली. या आवाजाने जागे झालेल्या जायभाय यांनी घराबाहेर येऊन कोण आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांना ७-८जण काठय़ा घेऊन त्यांच्या दिशेने पळत येत असल्याचे दिसून आले. बचावासाठी जायभाय आपल्या घरात आले आणि त्यांनी दरवाजा आतून लावून घेतला. परंतु तोपर्यंत तेथे पोहोचलेल्या दरोडेखोरांनी लाथा मारून दरवाजा उघडला व घरात घुसून जायभाय यांना काठय़ांनी मारहाण केली. त्यांच्या कानाच्या मागे मारहाणीत जखम झाली. घरातील दोन महिलांचे सोन्याचे दागिने व रोख २५० रुपये असा ५८ हजारांचा ऐवज चोरटय़ांनी लुबाडला. जायभाय यांची विवाहित मुलगी मंगल दिवाळीसाठी माहेरी आली होती. तिच्या गळय़ातील ३० हजारांचे मणिमंगळसूत्र, १२ हजारांची कर्णफुले, कानातील ६ हजारांचा अलंकार, तसेच जायभाय यांच्या पत्नीच्या गळय़ातील ९ हजारांचा दागिना असा ऐवज लुटण्यात आला.     

Story img Loader