पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना विशेषत: ज्येष्ठांना लुटणारी टोळी गुन्हे शाखेच्या युनिट ३ पथकाने गजाआड केली आहे. त्यांच्याकडून २० गुन्हे उघडकीस आणत एक किलो वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह ३५ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
तबरेज जाकीर जाफरी (वय- २६, रा. ईराणीवाडा, शांतीनगर, भिवंडी), असूद अजबूर जाफरी (वय- २०, जब्बर कंपाऊंड, भिवंडी), महमंद गुलाम हुसेन जाफरी (वय- २२, रा. आंबिवली, कल्याण) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर अन्य आरोपी फरारी आहेत. पोलीस उपायुक्त राजेंद्र बनसोड, सहायक पोलीस आयुक्त विनोद सातव, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पथकात जािलदर तांदळे, अरुण सुर्वे, विवेकानंद सपकाळे, काळूराम रेणूसे, अशोक भोसले, भरत उदाळे, नागनाथ लकडे, शशीकांत िशदे, राजेंद्र मोरे, राजेंद्र िशदे आदींचा समावेश आहे.
अनेक दिवसांपासून पोलीस या टोळीच्या मागावर होते. हे आरोपी व त्यांचे फरारी साथीदार ठाण्यातून पुण्याला येत. मोटार सायकलवरून ते सकाळी येत. पोलिसांप्रमाणे केसांची ठेवण करत. एकजण सावज हेरून इतर आरोपी पुढची कामगिरी करत होते. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही टोळी पकडण्यात आली. चतुश्रृंगी, चिंचवड, सांगवी, निगडी, िपपरी, सहकारनगर, बिबवेवाडी, विश्रामबाग, कोथरूड, हडपसर आदी भागात अशाप्रकारचे गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या गुन्ह्य़ात एक किलो ८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व आरोपींनी गुन्ह्य़ात वापरलेल्या मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
अशाप्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या इसमावर संशय आल्यास नागरिकांनी ओळखपत्र मागावे अथवा १०० नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbers ranout who robe the things as he shown dublicate police