धर्माधिकारी मळा येथे आज दुपारी डॉ. नंदकिशोर कल्याण काशिद यांच्या घरात चोरी झाली. बंद घराचे दार उचकटून चोरटय़ांनी तब्बल ६ लाख ६१ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने पळवले. चोरटय़ांचा माग लागू शकला नाही.
धर्माधिकारी मळा येथे डॉ. काशिद यांचे सुमनसुधा अपार्टमेंटमध्ये घर आहे. ते स्वत: नोबल रुग्णालयात आहेत व त्यांच्या पत्नीही नेत्रतज्ञ असून बूथ रूग्णालयात काम करतात. सकाळी दोघेही घरून आपापल्या कामाच्या ठिकाणी गेले. नंतर त्यांची मोलकरीण आली, तिनेही काम उरकले व तिही कुलूप लावून गेली. नेहमीच त्यांच्याकडे याच पद्धतीने काम चालते.
दुपारी श्रीमती काशिद घरी आल्यावर त्यांना घराचे दार उचकटलेले दिसले. घरात गेल्यावर कपाटांमध्येही बरीच उचकापाचक झालेली दिसली. त्यांनी तपासणी केली त्यावेळी सोन्याचे दागिने व रोख रक्कम गेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच डॉ. काशिद यांना याची माहिती दिली. त्यांनी घरी आल्यावर सर्व माहिती घेऊन तोफखाना पोलिसांकडे फिर्याद दिली.
पोलीस निरीक्षक वळवी लगेचच घटनास्थळी गेले. त्यांनी चौकशी सुरू केली. त्यात काही माग लागू शकलेला नाही. रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करून घेण्याचे काम सुरू होते. डॉक्टर दाम्पत्याने कोणावर संशय व्यक्त केला आहे किंवा काय ते समजू शकले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा