बंद घरे धुंडाळून शहरात चोरटे धुमाकूळ घालत असताना या घटना रोखण्यात इमारतीतील रहिवाशांबरोबर पोलीस यंत्रणाही अपयशी ठरली आहे. दिवसागणिक घटना घडत असताना त्यांचा छडा लागत नसल्यामुळे चोरटय़ांना जणू मोकळे रान सापडल्याचे चित्र आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात तीन ठिकाणी पुन्हा घरफोडी करत सुमारे दोन लाखाचे दागिने लंपास केले.
सातपूरच्या शिवाजीनगर भागातील दिशादृष्टी अपार्टमेंटमधील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी आतमध्ये प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सोन्याची ठूशी, सोन्याची पोत, बाळाच्या पायातील तोरडय़ांचे जोड असा एकूण २० हजार रुपये किंमतीचा माल चोरटय़ांनी लंपास केला. शारदा पाळदे यांच्या घरात ही घटना घडली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. बंद घराच्या स्वयंपाकगृहातील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरटय़ांनी स्टीलच्या डब्यातील, हॉलमधील लोखंडी कपाटाच्या चाव्या काढून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम, अंगठी, सोन्याचा गोफ, नेकलेस असा सुमारे ६१ हजार रुपयांचा माल गायब केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या स्वरुपाची आणखी एक घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या ठिकाणी बंद घर चोरटय़ांचे लक्ष्य ठरले. टाळे तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला. सोन्याचे मंगळसूत्र, कानातील रिंग, सोन्याची नथ, अंगठय़ा असे एकूण सहा तोळे वजनाचे ६१ हजार ५०० रुपये किंमतीचे दागिने लंपास केले.
मागील काही महिन्यांपासून चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे लक्षात येते. बंद घरे चोरटय़ांकडून धुंडाळली जात आहेत. नागरीकही बाहेरगावी जाताना शेजारील कुटुंबियांना कल्पना देत नसावे. परिणामी, बंद घरात चोरटय़ांना विनासायास प्रवेश करणे सुकर झाले आहे. बंद घरे फोडण्याच्या घटना दिवाळी व उन्हाळ्याच्या सुटीत अधिक्याने घडतात. पोलीस यंत्रणा ‘आपला शेजारी, खरा पहारेकरी’ हा उपक्रमही राबवित असते. कारण, प्रत्येक इमारतीतील बंद घराकडे लक्ष ठेवणे पोलिसांना अवघड आहे. या स्थितीत इमारतीतील रहिवाशांनी कोणी अनाहुत व्यक्ती आवारात प्रवेश करणार नाही याची दक्षता बाळगणे आवश्यक ठरते. परंतु, ही खबरदारी घेतली जात नसल्याचे चोरीच्या वाढत्या घटनांनी अधोरेखीत झाले आहे. दुसरीकडे उपरोक्त घटनांचा छडा लागत नसल्याने ज्यांच्या घरातून ऐवज लंपास झाला, ते कुटुंबिय हवालदील झाले आहेत. दागिने खेचून नेणे, लुटमार, दुकाने फोडणे असे प्रकार अधुनमधून नेहमी घडत असतात. गेल्या काही महिन्यात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. याआधी अशा काही घटनांमध्ये यशस्वी तपास करून संशयितांना मुद्देमालासह अटक केली जात होती. परंतु, सध्या हे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. गुन्हे वाढत असताना त्यांचा तपास लागत नसल्याने चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा