पुणे-बेंगलोर महामार्गावर खेड शिवापूर ते सातारा रस्त्यावर मागील सहा महिन्यांपासून दुचाकीस्वारांना प्राणघातक शस्त्रांचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला खंडाळा पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून २ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सातारा ते खेडशिवापूरदरम्यान मागील सहा महिन्यांपासून दुचाकीस्वारांना लुटण्याचे प्रमाण वाढले होते. दुचाकीवरून येऊन मोटारसायकलस्वारांना गाडी आडवी मारून प्राणघातक शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्या जवळील रोख रक्कम, मोबाईल, दागिने हिसकावून घेत असत. काही वेळा ही टोळी मारहाणही करत असे. एक महिन्यापूर्वी चंदगड (कोल्हापूर) येथील दोघांची अशी लूट खंबाटकी घाटात तलवारीचा धाक दाखवून केली होती.
या गुन्ह्य़ाचा तपास करताना खंडाळा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांच्या सहकाऱ्यांनी चंद्रशेखर उर्फ अप्पा मोहन एरंडे, (वय २१) विशाल शंकर महागंडे (२१, रा. परखंडी, ता. वाई) व सुशांत सुरेश सावंत (वय २०, रा. लिंब, सातारा) या तिघांना अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी खंबाटकी घाटातील गुन्ह्य़ाची कबुली दिली. त्यांच्याकडून ६ जबरी चोऱ्या, ६ मोटार सायकली, मोबाईल, रोख रक्कम, सोन्याचे दागिने, शस्त्रे असा एकूण २ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या आरोपींनी खंबाटकी घाटातील गुन्ह्य़ाची कबुली दिली आहे. शिवाय महामार्गावर भुईंज, लिंब खिंड, राजगड (पुणे) सारोला पेट्रोल पंपाजवळ, तसेच फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने असलेली बॅग चोरल्याची कबुली दिली आहे. या सर्व गुन्ह्य़ातील मुद्देमाल खंडाळा पोलिसांनी हस्तगत केला आहे.

Story img Loader