कपिलनगरातील घटनेने खळबळ
र्मचट नेव्हीमधून सेवानिवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याच्या घरात सोमवारी पहाटे शिरलेल्या दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. दरोडेखोरांच्या मारहाणीत अधिकारी व त्याची पत्नी गंभीर जखमी झाले. मुलाचा मृत्यू झाला. उत्तर नागपुरातील कपील नगरात खळबळजनक घटना घडली. दरोडेखोर नक्की किती होते, त्यांनी किती ऐवज लुटला हे स्पष्ट झालेले नाही.
अन्वर हुसेन नबी बक्श व त्याची पत्नी कनीज फातमा ही जखमींची नावे असून त्या दोघांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाहरुख हुसेन अन्वर हुसेन हे मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. हे तिघेही काल रात्री झोपले होते. पहाटे मारहाणीमुळे कनीज फातमा यांना जाग आली. त्यांनी समोर दोघांना पाहिले. त्या दोघांनी पुन्हा लोखंडी दांडक्याने मारहाण केली. त्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडले. जाताना बेदम मारहाण केली आणि ते निघून गेले. या प्रकाराने कनीज बेशुद्ध पडल्या. पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास त्यांना जाग आली. त्या कशातरी उठल्या आणि घराबाहेर आल्या. घराजवळ कुणी दिसते काय हे पाहत असताना त्या घेरी येऊन खाली पडल्या. काही पावलांवर असलेल्या घरातील एका महिलेला हे दिसले. ते कुटुंब धावत आले. त्यांनी फातीमा यांना उचलून घरात आणले तेव्हा घरातील दृश्य पाहून लगेचच त्या कुटुंबाने नियंत्रण कक्षाला कळविले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक जाधव यांच्यासह जरीपटका पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी फातीमा तसेच अन्वर हुसेन यांना तातडीने मेयो रुग्णालयात पाठविले. तोपर्यंत पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक, सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, पोलीस उपायुक्त मंगलजित सिरम व सुनील कोल्हे, सहायक पोलीस आयुक्त बाबा डोंगरे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गंगाराम साखरकर यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक, श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञ तेथे पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले. घरातील खोल्यांमधील कपडे व इतर सामान अस्ताव्यस्त पडले होते. कपाटे उघडी होती. समोरच्या दरवाजाचा कडी-कोंडी तुटलेला होता.  
अन्वर हुसेन र्मचट नेव्हीमधून फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी कपील नगरातील गुरुनानक फार्मसी महाविद्यालयासमोर बंगला बांधला. बंगल्याचे बांधकाम सध्या सुरूच आहे. येथे लोकवस्ती विरळ आहे. घरापासून पुढे मुस्लिम दफनभूमी असून मोकळा भाग आहे. पोलिसांच्या श्वानाने जवळच्या नाल्यापर्यंत माग दाखविला. तेथे एक रिकामी बॅग पडलेली दिसली. गुन्ह्य़ाच्या पद्धतीवरून विशिष्ट प्रकारच्या टोळीचे हे कृत्य असावे, अशी शंका पोलिसांना आहे. या घटनेमुळे अन्वर तसेच फातिमा या प्रचंड घाबरलेल्या असून त्या बोलणच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यामुळे नक्की किती व कोणचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला, किती दरोडेखोर असावेत, याचा उलगडा झालेला नव्हता. किमान दोन दरोडेखोर असावेत आणि लाखोचा ऐवज नेला असावा, असा अंदाज आहे. त्यांच्या अंगावरील जखमा पाहता लोखंडी दांडका व काठय़ांनी मारहाण झाल्याची पोलिसांना शंका आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा