जालना जिल्ह्य़ातील परतूर येथील रेल्वे फलाटावर थांबलेल्या देवगिरी एक्स्प्रेसवर दगडफेक करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. सात दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी या सातही आरोपींना अटक केली.
मुंबईकडे जाणारी देवगिरी एक्स्प्रेस परतूर फलाटावर थांबली असता हा प्रकार घडला. दरोडेखोरांनी दगडफेक सुरू करून खळबळ उडवून दिली. फलाटावरील रेल्वे पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत हवालदार धनगर धारदार शस्त्राने हल्ल्यात जखमी झाले. अन्य एक हवालदारही जखमी झाला. आरोपी गोविंद लड्डू काळे यास पोलिसांनी शिताफीने पकडले. सेलू येथील रेल्वे पोलीस चौकीला या प्रकाराची माहिती कळविण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक डम्बाळे व त्यांच्या पथकाने रात्रीतून आरोपींना अटक करण्यासाठी गस्त सुरू केली. परतूर पोलिसांच्या मदतीने डोंगऱ्या खोबराजी काळे (वय १९), संजय शिवाजी चव्हाण (वय २०), चंदर दादाराव पवार (वय २३), सुरेश रामडय़ा चव्हाण (वय २१), सनी लड्डू काळे (वय १८), किसन रामा चव्हाण (वय १८) या आरोपींना अटक करण्यात आली. आरोपी परतूर तालुक्यातील साठेनगर, पारधीवाडा येथील रहिवासी आहेत. रेल्वे पोलिसांनी दरोडय़ासह इतर कलमान्वये औरंगाबाद येथे गुन्हा दाखल केला. आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली.

Story img Loader