श्रीगोंद्याला आठवडय़ात दुसरा दरोडा
श्रींगोदे तालुक्यातील मांडवगण येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेवर दरोडा टाकून १३ लाखांची रोकड पळवण्यात आली. आठवडाभरातच तालुक्यात दोन दरोडे पडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी  प्रचंड नाराजी पसरली आहे.
मांडवगण येथे भरवस्तीत जिल्हा बँकेची शाखा आहे. आज मध्यरात्री दरोडेखोरांनी प्रथम बँकेसमोर गाडी आडवी लावली. नंतर एक व्यक्ती आत प्रवेश करेल ऐवढेच गेट त्यांनी कापले व आत प्रवेश करून गॅसकटरच्या साहाय्याने तिजोरी कापली. तिजोरीतील १३ लाख ७ हजार ७०७ रूपयांची रोकड घेऊन दरोडेखोरांनी आरामात पोबारा केला. तिजोरीशेजारीच बँकेचे लॉकररूम होते, मात्र सुदैवाने ते फोडले नाही; अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.
दरम्यान, बँकेची सायरन यंत्रणा बंद होती व नियमाप्रमाणे एकही सुरक्षारक्षक येथे तैनात नव्हता. त्यामुळे चोरटय़ांना कोणताच अडथळा आला नाही. याच शाखेवर दोन वर्षांंपूर्वीही चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यानंतरही येथे सुरक्षेची कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. तालुक्यातीलच ढवळगाव शाखेवर दीड वर्षांपूर्वी दरोडा पडला होता, त्यावेळी सुमारे ३२ लाखांची रोकड पळवली होती.
जिल्हा बँकेच्या शाखा दरोडेखोरांनी लक्ष्य केलेल्या असतानाही बँकेचे पदाधिकारी कोणतीच उपाययोजना करीत नाहीत, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येते. मांडवगण शाखेच्या दरोडाप्रकरणी बँकेच्या कर्मचाऱ्यांचाच हात आहे काय, अशी चौकशी करणार असल्याचे पोलीस निरीक्षक अजय जाधवराव यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी खिस्ती यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे येऊन पाहणी केली.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery from mandvgan branch of 13 lakhs