क्रॉसिंगसाठी थांबणाऱ्या रेल्वेगाडय़ांवर सशस्त्र दरोडे टाकून प्रवाशांना लुटणाऱ्या एका टोळीला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीने ३० ते ४० गुन्हे केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. या टोळीचा म्होरक्या प्रभाकर ऊर्फ बबऱ्या रावसाहेब वाघमोडे (वय ३०) याच्यासह त्याच्या अन्य दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने मालमोटारचालकाचा खून केल्याची माहितीही प्रकाशात आली आहे.
प्रभाकर वाघमोडे (रा. नजीक पिंपरी, ता. मोहोळ) याच्यासह विलास व्यंकट शिंदे (वय २५, रा. यल्लमवाडी, ता. मोहोळ) व समाधान अजिनाथ काळे (वय २५, रा. उंबरे पागे, ता.पंढरपूर) यांना सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे.
सोलापूर-पुणे लोहमार्गावरजिंती, ढवळस, वाकाव, अनगर, मलिकपेठ, केम आदी भागात क्रॉसिंगसाठी थांबणाऱ्या रेल्वेगाडय़ांवर सशस्त्र दरोडे टाकून प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वरचेवर वाढत आहेत. यात गेल्या पाच वर्षांपासून प्रभाकर वाघमोडे याच्या टोळीचा सहभाग असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विजापूर रस्त्यावर टाकळी व झळकी येथे सापळा लावून ही टोळी पकडली.
या टोळीचा म्होरक्या प्रभाकर वाघमोडे याने एका युवतीशी प्रेमविवाह केला होता. परंतु नंतर भांडण काढून त्याने पत्नीचा खून केला होता. या गुन्ह्य़ात तो फरारी होता. याच टोळीने उस्मानाबाद जिल्ह्य़ात लोहारा तालुक्यात आष्टामोड येथे एका मालमोटारचालकाचा खून करून त्याच्याजवळील ऐवज लुटल्याची केल्याची माहितीही समोर आली आहे.