मानवी हक्क संघटनेच्या नावाखाली बेकार तरुणांना आकर्षित करून रेल्वेत नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या पाचजणांच्या टोळीला शासकीय विश्रामगृहात मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या पथकानेच छापा टाकून पकडले. या टोळीविरुद्ध सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या टोळीला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
स्थानिक पोलिसांनी असहकार्य केल्याने अखेर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाच ही कारवाई करणे भाग पडले. इंटरनॅशनल हय़ुमन राईट असोसिएशन नावाची संघटना चालवणाऱ्या या टोळीकडून एक चारचाकी मोटार, मोटारसायकलीसह रेल्वे भरतीचे सुमारे दीडशे अर्र्जाचे नमुने, लॅपटॉप, मोबाइल संच हस्तगत करण्यात आले. जप्त मोटारीवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, स्पेशल टास्क फोर्स असा मजकूर असलेल्या पाटय़ा बसविण्यात आल्याचे आढळून आले. राजकुमार टाक (वय ३१), आनंद सीताराम टाक (वय ३३, दोघे रा. म्हाडा वसाहत, कन्नमवार नगर, मुंबई), सूरज अशोक पांडे (वय ३८, रा. स्नेहल अपार्टमेंट, लक्ष्मीपेठ, सोलापूर), शंकर शेखर गाड (वय २५, रा. विक्रोळी, मुंबई) व अमर चंद्रपाल रिजोरा (वय ३२, रा. उजनी वसाहत, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
या संदर्भात माहिती देताना म. रे.च्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी सांगितले, की मानवी हक्क संघटनेचे पदाधिकारी म्हणून मिरवणारे काही तरुण बेकार युवकांना हेरून रेल्वेत नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत आहेत. त्यासाठी संघटनेचे सदस्य होण्याकरिता प्रत्येकी २१ हजारांचे शुल्क घेत असल्याची माहिती मिळाली होती. ही टोळी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात गेल्या तीन-चार दिवसांपासून सक्रिय असल्याचे समजल्यावरून स्थानिक पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. परंतु थेट तक्रारदार नाही म्हणून पोलिसांनी कारवाई करण्यास असमर्थता दर्शविली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधण्याचा सल्ला दिला गेला. परंतु सदर मानवी हक्क संघटना ही बिगर सरकारी असल्याने त्यात कारवाई करता येणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिले. त्यामुळे अखेर रेल्वे अधिकाऱ्यांच्या पथकानेच धाडस दाखवून शासकीय विश्रामगृहात धाड टाकून संबंधित टोळीला पकडले व त्यांचा निवास कक्ष सीलबंद केला. अखेर पोलिसांनी वस्तुस्थिती विचारात घेऊन बेकारांना फसविणाऱ्या टोळीला जेरबंद केले.
फसगत झालेल्यांपैकी नीलेश राजेश शिंदे (रा. सोलापूर) या तरुणाने फिर्याद नोंदवली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या टोळीने बेकार तरुणांना रेल्वेत नोकऱ्या लावण्याचे आमिष दाखवून ६३ हजारांना गंडविल्याचे दिसून आले. फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रेल्वे भरती बोर्डाच्या दक्षिण विभागाकडून मंत्री कोटय़ातून कनिष्ठ तिकीट तपासणीस (टीसी) पदावर नोकऱ्या लावण्याचे आमिष दाखवून या टोळीने सुरुवातीला संबंधित बेकार तरुणांकडून प्रत्येकी २१ हजार उकळण्यात आले. नंतर नोकरीचे नियुक्तिपत्र मिळाल्यानंतर दहा लाख देण्याचे ठरले होते. मात्र अशी भरती नसल्याचे तसेच दक्षिण रेल्वे भरती बोर्डाचे मुख्यालय नवी दिल्ली नसून, तर चेन्नई येथे असल्यामुळे हा फसवणुकीचा प्रकार उघड होण्यास उशीर लागला नाही.
रेल्वेत नोकऱ्या लावण्याचे आमिष दाखवून लुबाडणारी टोळी जेरबंद
मानवी हक्क संघटनेच्या नावाखाली बेकार तरुणांना आकर्षित करून रेल्वेत नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या पाचजणांच्या टोळीला शासकीय विश्रामगृहात मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या पथकानेच छापा टाकून पकडले. या टोळीविरुद्ध सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या टोळीला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
First published on: 22-02-2013 at 09:50 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery gang arrested showing inducement in railway recruitment