मराठवाडयासह बीड जिल्ह्य़ात दरोडे, लूटमार करून धुमाकूळ घालणारी खतरनाक टोळी आज नगर – सोलापूर या राज्यमार्गावर दरोडयाच्या तयारीत असताना मध्यरात्री दोन वाजता कर्जतचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांच्या नेतृत्वाखाली कर्जतच्या पोलीसांनी शस्त्रांसह पकडली.
विक्रम शिवराम शिंदे (वय,३०), सुरेश शिवराम शिंदे (वय ३५),उत्तम शिवराम शिंदे (वय २५) व नाना अर्जून शिंदे (सर्व राहणार नांदुर गायरान तालुका केज जिल्हा बीड,), चंदु सरदार पवार (वय ५५) बाळु चंदु पवार (वय २५), नाना चंदु पवार (वय १९) (तिघे राहणार, पाटेगांव,ता. कर्जत) व अरूण रावसाहेब काळे (वय २१,राहणार, नागेश विद्यालयाजवळ, जामखेड) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
आज मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस निरीक्षक ढोकले यांना निनावी फोन वरून नगर -सोलापूर रस्त्यावर पाटेवाडी शिवारात वळण असलेल्या ठिकाणी रस्ता लुट करण्यासाठी दरोडेखोरांची टोळी लपली आहे अशी माहिती सांगण्यात आली. ढोकले यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मणराव ढोकले, आर. जी. सोनवणे, ए. टी. पोटे, डी. बी. जाधव, जी. डी. इंगावले, एम. पी. पाढांरकर, ए.एस. खोमणे व सतीश सोनमाळी ,अफसार पठाण हे पंच याचे पथक तात्काळ घटना स्थळी खाजगी वाहनाने पाठवले.
मिळालेल्या माहीती च्या ठिकाणी पोहताच या पथकाने पाहणी केली. त्यांना नगर- सोलापूर रस्त्याच्या कडेला रस्ता लुटीसाठी दबा धरून बसलेली टोळी दिसली. त्यांना कसल्याही हालचालीची संधी न देता पथकाने त्यांच्यावर झडप टाकली व सगळ्यांना पकडले. या दरोडेखोरांकडे कोयता, विळा, मिरचीची पुड, गज, तसेच टीव्हीएस मॅक्स कपंनीच्या २ मोटार सायकली (क्रमांक एम एच २३ जी ९८९७ व एम एच १७ जे ४०९२) पण सापडल्या. या मुद्देमालासह सर्वाना अटक करण्यात आली.
पकडलेल्यांपैकी विक्रम शिंदे याच्यावर मराठवाडा व बीड जिल्हयात विविध प्रकारचे तब्बल ३६ गुन्हे दाखल आहेत. त्याचा भाऊ सुरेश याच्यावर २१ तर तिसरा भाऊ उत्तम याच्यावर १२ गुन्हे दाखल आहेत. या तिघांनी मराठवाडा व बीड पोलिसांच्या नाकात दम आणला होता. पोलिसांनी त्यांना फरार घोषित केले होते. त्यांना पकडण्यात कर्जत पोलीसांना यश आले आहे. या सर्वांवर सामूहिक गुन्हेगारी अंतर्गत मोका लावण्याचा प्रस्ताव गृहमंत्री आर आर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे असे ढोकले यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा