दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला रविवारी रात्री जुना राजवाडा पोलिसांनी पकडले. यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्य़ात सहभागी असलेल्या या आरोपींकडून धारधार शस्त्रे, वाहन यांसह ८ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रवी सुरेश शिंदे (२६, रा. साळुंखे पार्क), जावेद कुन्नुर (३५, रा.तारदाळ, ता. हातकणंगले), फय्याद असाद नगारजी (२९, रा. साळुंखे पार्क), भीमराव मंगलसिंग बेल्लाळ (२२, रा. ता.शिरोळ), विशाल दीपक चव्हाण (२४, रा. जवाहरगनर) यांना अटक केली आहे. राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तपोवन मैदान परिसरामध्ये एक स्कॉर्पिओ मोटार व दोन मोटारसायकली घेऊन काही तरुण संशयास्पदरीत्या वावरत होते, अशी माहिती राजवाडय़ाचे पोलीस निरीक्षक यशवंत कडगे यांना मिळाल्यावर ते  घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी छापा टाकून दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या सहाजणांना अटक केली. त्यांच्याकडून एक जांबीया, तीन कोयते, कटावणी, भारी किमतीचे ९ मोबाईल, स्कॉर्पिओ, दोन मोटारसायकली असे साहित्य जप्त केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

Story img Loader