शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयासमोरून दोन अज्ञात चोरटय़ांनी ७ लाख ६० हजार रुपयांची बॅग लंपास केली. शुक्रवारी भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली.
चार दिवसांपूर्वी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्धाचे दोन लाख रुपये चोरटय़ांनी लंपास केले. भरदिवसा ही चोरी झाली. या प्रकारानंतर त्याच रात्री चोरटय़ांनी पावडे पेट्रोलपंपावर दरोडा टाकला. दोन्ही प्रकरणांच्या तपासात कोणतीही प्रगती झाली नाही. या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी वरील प्रकार घडला. ‘एसकेएस मायक्रोफायनान्स’ कंपनीच्या चौघांना याचा फटका बसला.
हैदराबाद येथे मुख्य शाखा असलेल्या या कंपनीने नांदेडमध्ये १९९८ पासून आपले बस्तान बसविले. बचतगटांना कर्जरूपाने आर्थिक मदत पुरविणाऱ्या या कंपनीचे विठ्ठल रामभाऊ गायकवाड (उकळी, तालुका औंढा), रवी कांबळे (परभणी), सत्यनारायण पगडोपवार (किनी, तालुका भोकर) व सतीश कंधारे (पोफळी, तालुका उमरखेड) हे चौघे नेहमीप्रमाणे कलामंदिर येथील अ‍ॅक्सिस बँकेत पैसे घेण्यास गेले होते. कंपनीच्या खात्यातून त्यांनी ७ लाख ६० हजार रुपयांची रोकड उचलली. दोन वेगवेगळ्या मोटरसायकलींवर कार्यालयात जाण्यासाठी हे चौघे बँकेबाहेर पडले.
शिवाजीनगर भागातून ते विसावा गार्डनमार्गे एमजीएम कॉलेजकडे जात असताना रजिस्ट्री कार्यालयाजवळ त्यांच्यावर पाळत ठेवून पाठलाग करणाऱ्या दोघांनी लाथ मारून मोटरसायकल पाडली. ज्यांच्याजवळ रक्कम होती, त्यांच्याच मोटरसायकलला लाथ मारल्याने मोटरसायकलवरील विठ्ठल गायकवाड व रवी कांबळे हे दोघे खाली पडले. कंपनीचे दुसरे दोघे समोर असल्याने त्यांना पडल्याचा आवाज आला. याच दरम्यान चोरटय़ांनी त्यांच्याजवळील बॅग हिसकावून पोबारा केला. सोबत असलेल्या पगडोपवार व सतीश कंधारे या दोघांनी चोरटय़ांचा आयटीआयपर्यंत पाठलाग केला, पण चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.
एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे ही घटना घडल्यानंतर भयभीत झालेल्या कंपनीच्या चौघांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी नाकाबंदी केली, काहींची चौकशीही केली. पण अद्याप या प्रकरणाचा उलगडा झाला नव्हता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.   

Story img Loader