घरात शिरून चाकू व पिस्तुलसारख्या शस्त्राचा धाक दाखवून तीन लुटारूंनी एका तरुणाला लुटल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास दक्षिण नागपुरातील नरेंद्रनगर म्हाडा कॉलनीत घडली.
सचिन प्रेमनारायण वर्मा हा काल रात्री घरीच होता. त्याचे वडील अर्धागवायूने आजारी आहेत. ते दोघेही घरात असताना तीन तरुण घरात शिरले. त्यांच्या हातात चाकू व पिस्तुलसारखे शस्त्र होते. ते सचिनच्या कानावर टेकवून ठार मागण्याची धमकी देत घरातील ऐवज मागितला. सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप, कॅमेरा, नगदी पंधरा हजार, असा एकूण २ लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज लुटून लुटारू पळून गेले. या घटनेची माहित मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र काटोले यांच्यासह अजनी पोलीस पोहोचले. पोलीस उपायुक्त चंद्रकिशोर मीणा, सहायक पोलीस आयुक्त गंगाराम साखरकर तेथे आले. पोलिसांनी सचिनची विचारपूस केली. कॉटन मार्केट चौकातील हॉटेल अर्जुनमध्ये तो नोकरी करतो. लुटारू साधारण तिशीतले असावेत. पिस्तुलसारखी बंदूक त्यांच्याजवळ होती, असे त्याचे म्हणणे आहे. याप्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दुसरी घटना सदरमधील लिबर्टी बारमध्ये बुधवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास घडली. दोघे तरुण बारमध्ये शिरले. आत येताच त्यांनी धुडगुस घातला. तोडफोड करीत गल्ल्यातील नोटा लुटून ते पळून गेले. त्यांच्या हाती केवळ आठ हजार रुपये लागले. हे समजल्यानंतर सदर पोलीस तेथे पोहोचले. राजेश व सनी ही आरोपींची नावे असल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी गुन्हा
नोंदवला.
घरफोडी
दाराचा कुलूप-कोंडा तोडून चोरटय़ांनी सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला. दुपारे लेआऊटमध्ये बुधवारी सकाळी साडेदहा ते साडेबारा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. अमित मिलींद नाईक हा त्याच्या कार्यालयात तर त्याचे आई-वडील भंडारा येथे गेले होते. दरम्यान घराच्या दाराचा कुलूप-कोंडा तोडून आत शिरलेल्या चोरटय़ाने सोन्याचे दागिने (किं. सव्वा लाख रुपये) चोरून नेले. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला.