औषध फवारून बेशुध्द केले
पढेगाव येथे मध्यवस्तीत एका शिक्षकाच्या घरी चोरी होऊन सुमारे दीड लाख रूपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. त्यानंतर चोरटय़ांनी एक दुचाकी मोटारसायकलही चोरून नेली. घरात झोपेत असलेल्या चौघांवर स्प्रे मारून त्यांना बेशुद्ध करून चोरटय़ांनी चातुर्याने केलेल्या चोरीमुळे पोलिसही थक्क झाले आहेत.
यशवंत विद्यालयात सोमनाथ भाऊसाहेब गायकवाड हे शिक्षक असून ते पढेगाव येथील मध्यवस्तीतील आझाद मैदान भागात राहतात. ते कुटूंबासह घरात झोपले होते. दाराची कडी बाहेरून उघडून घरात आल्यानंतर चोरटय़ांनी खोलीत झोपलेल्यांवर औषधी स्प्रे मारला. त्यामुळे त्यांना गाढ झोप लागली. पहाटे साडेपाच वाजता गायकवाड यांना जाग आली. त्यावेळी त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरटय़ांनी घरातील रोख ३५ हजार रूपये, चार तोळे दागिने व दोन मोबाईल चोरून नेले. गायकवाड यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक जागे झाले. पण त्यापुर्वी चोरटय़ांनी पलायन केले होते. तालुका पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद नोंदविली आहे.     

Story img Loader