शहरातील कुमठा नाका परिसरातील न्यू आनंदनगरात दोन घरफोडय़ा होऊन त्यात सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम व अन्य ऐवज असा सुमारे १४ लाखांचा माल चोरटय़ांनी लांबविला. या दोन्ही घरफोडय़ांच्या गुन्हय़ांची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.
रसिका राजाराम वजनम (वय ५७) यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार वजनम कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्या वेळी चोरटय़ांनी त्यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोन्याचे नेकलेस, अंगठय़ा, पाटल्या, लॉकेट आदी ६९ तोळे दागिने तसेच चांदीचे विविध दाागिने, मोत्यांचा सेट व ५५ हजारांची रोख रक्कम असा एकूण १२ लाख ४६ हजारांचा ऐवज चोरटय़ांच्या हाती लागला.
वजनम यांच्या शेजारी राहणा-या साधना सूर्यकांत दंतकाळे यादेखील त्यांच्यासमवेत परगावी गेल्या होत्या. चोरटय़ांनी दंतकाळे यांचेही घर फोडले. त्यांच्या घरातून सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असे मिळून एक लाख ६० हजारांचा ऐवज चोरून नेला. शहरात घरफोडय़ा, जबरी चो-यांचे प्रमाण वाढत चालले असून तीन दिवसांपूर्वी विजापूर रस्त्यालगत नवीन आरटीओ कार्यालयाच्या पुढे नागू नारायणवाडी परिसरात माजी महापौर तथा दलित मित्र भीमराव जाधव यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी ४० तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व रिव्हॉल्व्हर असा सुमारे १९ लाखांचा किमती ऐवज लुटून नेला होता. या गुन्हय़ाच्या तपासासाठी गुन्हे शाखेची यंत्रणा कामाला लागली असताना आता कुमठा नाका परिसरात न्यू आनंदनगरातील दोन घरफोडय़ा झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा