शहरातील सूत गिरणीजवळील मधुरा रुग्णालयाजवळ पोलीस असल्याचे सांगून ५५ वर्षांच्या महिलेच्या हातातून ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पळविल्याची घटना रविवारी घडली. सकाळी ७ वाजता मोटरसायकलवरून आलेल्या दोघांना आम्ही पोलीस आहोत आणि तपासणी सुरू आहे, असे सांगून शैला देविदास जावळे यांच्या हातातील चार तोळ्यांच्या बांगडय़ा काढून घेतल्या. तपासणी केल्यानंतर त्या परत दिल्या जातील, असे सांगितले. बनावट बांगडय़ा शैला जावळे यांच्या हातात ठेवून चोरटे फरार झाले.
शहरात विविध ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मंगळसूत्र चोरांची नवी टोळीच शहरात कार्यरत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मंगळसूत्र चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी १५ पथके स्थापन केली आहेत. गर्दीच्या ठिकाणीही पोलिसांची विशेष गस्त ठेवण्यात आली आहे. तरीही शहरात विविध ठिकाणी चोऱ्या होत आहेत. घरफोडी झाली की मंगळसूत्र चोरी होते आणि त्यातील आरोपी पकडले जातात न जातात तोच बनावट पोलीस बनून काही जण फसवणूक करीत आहेत. शिवाजीनगर येथे राहणाऱ्या शैला जावळे सकाळी फिरून परतत असताना मधुरा हॉस्पिटलजवळ त्यांना दोघांनी अडविले. त्यांच्याकडून ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणात तपास सहायक पोलीस निरीक्षक विष्णू तांदळे करीत आहेत.