कसबा बावडा येथील प्राध्यापकाच्या बंगल्यामध्ये धाडसी चोरीचा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास घडला. चोरटय़ांनी २५ तोळे सोन्याचे दागिने, दीड किलो चांदीचे दागिने व रोख ६० हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केला. गृहराज्यमंत्र्याच्या निवासस्थानाजवळ हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये प्रा.महादेव कलाकती यांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहराचे उपनगर असलेल्या कसबा बावडा येथे कृष्णानंद कॉलनी आहे. या भागामध्ये प्रा.महादेव कलीकते हे पत्नी व मुली समवेत राहतात. ते डॉ.डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. चार दिवसांपूर्वी कलीकते पती-पत्नी अष्टविनायक यात्रा करून परतले होते. त्यांची मुलगी इस्लामपूर येथे शिक्षण घेत आहे. तिही काल घरी परतली होती. रात्री भोजन करून सर्व जण वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीमध्ये झोपावयास गेले होते.
झोपायला जाण्यापूर्वी तळ मजल्यावरील मुख्य दरवाजाला आतून कडी-कुलूप लावले होते. मात्र चोरटय़ांनी ते तोडून बंगल्यात प्रवेश केला. तळमजल्यावरच तिजोरी ठेवलेली आहे. तिजोरीला किल्ली तशीच लावलेली होती. त्यामुळे चोरटय़ांना विनासायास तिजोरी उघडण्यात आली. तिजोरीला असलेल्या ड्रॉवरच्या किल्ल्याही बाजूलाच ठेवण्यात आल्या होत्या. त्या घेऊन चोरटय़ांनी ड्रॉवर उघडले.
ड्रॉवरमध्य ेविविध प्रकारच्या सोन्या-चांदीचे दागिने ठेवण्यात आले होते. दागिने व रोख रक्कम घेऊन चोरटे लंपास झाले. सकाळी उठल्यावर कलीकते कुटुंबाला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक सयाजी गवारे, श्वानपथक, ठसेतज्ज्ञ दाखल झाले. या सर्वानी चोरटय़ांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये फारसे प्रयत्न आले नाहीत.गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या निवासस्थानापासून जवळच प्रा.कलीकते यांचा बंगला आहे. या बंगल्यात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. याच भागात तीन महिन्यांपूर्वी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका पतसंस्थेत धाडसी चोरीचा प्रकार घडला होता. त्याचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले नव्हते. पुन्हा धाडसी चोरीचा प्रयत्न घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.