एका सामान्य माणसाचे अचानक बदललेले राहणीमान, त्याने घेतलेली नवी गाडी यामुळे पोलिसांना दोन मोठय़ा दरोडय़ांची उकल करता आली. एमआयडीसी परिसरातील सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कारखान्यावर पडलेल्या दरोडय़ातील या इसमाचा सहभाग उघड झाला आणि आणखी सहा जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. तर तब्बल एक कोटी रुपयांचे चोरलेले सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत. योगेंद्रसिंग ऊर्फ ठाकूर असे त्याचे नाव आहे.  अंधेरी एमआयडीसीच्या सीप्झ भागात हिरे आणि सोन्याचे दागिने बनविणारे अनेक कारखाने आहेत. हे सोन्याचे दागिने घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना रस्त्यात अडवून त्यांच्याकडील दागिने लुटण्याच्या दोन घटना गेल्या महिन्यात घडल्या होत्या. या दोन घटनांमध्ये ३ कोटींचे दागिने लुटण्यात आले होते. पोलिसांना या दरोडय़ाचा काही तपास लागत नव्हता. परंतु अंधेरी येथील योगेंद्र सिंग ऊर्फ ठाकूर याच्या राहाणीमानात अचानक बदल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. योगेंद्र सिंग हा सीप्झमधील एका कंपनीत काम करीत असे. त्याने ती नोकरी सोडली होती. त्यातच नुकतीच त्याने नवीन गाडीही घेतली होती. गळ्यात सोन्याची चेन आणि हातात अंगठय़ा असा रुबाबही तो दाखवू लागला होता. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर या दरोडय़ाचा उलगडा पोलिसांना झाला. त्याला या परिसरातील कारखान्यांची, त्यात तयार होणारे दागिने, त्यांची ने आण करण्याची पद्धत याची इत्थंभूत माहिती होती. त्यानेचे हे दरोडे आपल्या साथीदारांसह घातल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी एक कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे लुटलेले दागिनेही जप्त केले आहेत. त्याच्यासोबत दरोडा घालणाऱ्या सहा जणांसह लुटीचा माल विकत घेणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल रॉय आणि सुरेश यादव मात्र अद्याप फरारी आहेत.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा