पेट्रोल पंपावर सहा जणांच्या टोळक्याने दरोडा टाकून पावणे तीन लाखाची रक्कम आणि चार भ्रमणध्वनी हिसकावून नेल्याचा प्रकार नागपूर-सुरत महामार्गावर तालुक्यातील नेर गावाच्या शिवारात घडला. पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून आलेल्या लुटारूंनी पिस्तुलचा धाक दाखवून हा दरोडा टाकला. महत्वाची बाब म्हणजे, पोलीस घटनास्थळी पोहोचताच दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करून पलायन केले.
धुळ्याच्या महापौर मंजुळा गावित यांचे पती तुळशीराम गावित यांच्या मालकीचा हा पेट्रोलपंप आहे. या पेट्रोल पंपावर शुक्रवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास इनोव्हा कारमधून सहा व्यक्ती आल्या. त्यांनी पंपावरील कर्मचारी व रोखपाल यांच्याशी हुज्जत घालत थेट पिस्तुलाचा धाक दाखवून रोकड मागितली. तिजोरीतील दोन लाख ७० हजार २५३ रूपये आणि चार भ्रमणध्वनी ताब्यात घेत त्यांनी पंपाची केबिन तसेच अन्य वस्तुंची तोडफोड केली. दरम्यानच्या काळात पोलीस घटनास्थळी पोहोचत असताना दरोडेखोरांपैकी एकाने हवेत गोळीबार करत सिनेस्टाईल इनोव्हा कार दामटली.
पोलिसांनी संशयित कारला अडविण्यासाठी सर्व प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी केली. परंतु कारचा शोध लागला नाही. बापू वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वसाहती आणि ग्रामीण भागात दररोज चोरी व लूट होण्याचे प्रकार घडत आहेत. पोलिसांच्या अपयशाविरूध्द नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून या आधीही शहरातच महापौरांच्या निवास स्थानावर हल्ला करण्याचा प्रकार झाला होता. या शिवाय शहर परिसरात अवैध धंदेही जोरात असल्याने धुळ्याचे पोलीस वादग्रस्त ठरले आहेत. पोलीस वसाहतीतील एका कर्मचाऱ्याच्या खोलीतून मद्यसाठा जप्त करण्यात आला होता. खुद्द पोलीस वसाहतीमध्येच जर मद्यसाठा सापडत असेल तर शहरातील इतर अवैध धंद्यांकडे पोलीस किती गांभिर्याने पाहात असतील, हे लक्षात येते.