तालुक्यातील घोटी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी शाखा निरीक्षकांच्या कक्षातील काही कागदपत्रे चोरण्याचा प्रयत्न केला. बँक निरीक्षक हरिश्चंद्र बऱ्हे यांनी याबाबत घोटी पोलिसात तक्रार दिली आहे. यापूर्वीही दोन वेळा बँकेत चोरीचा प्रयत्न झाला होता. तालुक्यातील सर्व शाखांचे मध्यवर्ती केंद्र ही शाखा आहे. विभागीय अधिकारी व बँक निरीक्षकांची कार्यालयेही याच बँकेच्या कक्षेत असल्याने या शाखेला विशेष महत्व आहे. त्यामुळे या शाखेत सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक असावा, संकटकालीन ध्वनिव्यवस्था असावी, सीसीटीव्ही कॅमेरा असावा, अशी ग्राहकांची मागणी आहे. शनिवारी रात्री बँकेत प्रवेश करणाऱ्या चोरटय़ांनी बँक निरीक्षकांच्या दोन्ही कार्यालयांमधून महत्वाच्या कागदपत्रांमधून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी सकाळी बँकेचे कुलूप तुटलेले असल्याची माहिती बँक निरीक्षक व शाखा व्यवस्थपकांना मिळताच त्यांनी बँकेत धाव घेतली. चोरटय़ांनी तिजोरीला हातही न लावता निरीक्षक कक्षातील कागदपत्रे अस्ताव्यस्त केल्याने अधिकारी संभ्रमात पडले आहेत.   

Story img Loader