कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण विकासाचा पाया ज्येष्ठ नेते माजी आमदार स्व. कारभारी भीमाजी रोहमारे यांनी रचला असल्याचे गौरवोद्गार माजी महसूलमंत्री शंकरराव कोल्हे यांनी काढले.
    येथील के. जे. सोमय्या महाविद्यालयात स्व. के. बी. रोहमारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त या वर्षीचे रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार नरेंद्र माहुरतळे (नागपूर), ज्ञानेश मोरे (जळगाव), कैलास दौड (अहमदनगर), अजीम नवाज राही(बुलढाणा) व डॉ. वैजनाथ अनमुलवाड (नांदेड) या लेखकांना ५००१ रुपये रोख व सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह श्री. कोल्हे यांच्या हस्ते देण्यात आले.
    अध्यक्षपदावरून श्री. कोल्हे पुढे म्हणाले की, नगर जिल्ह्य़ातच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात स्व. यशवंतराव चव्हाण यांचे विश्वासू सहकारी म्हणून के. बी. रोहमारे यांनी उत्तम कामगिरी केली. पद्मश्री विखे, कोपरगाव व संजीवनी साखर कारखाना स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा उचलला होता. गोदावरी प्रवरा खरेदी-विक्री संघाच्या व्यवस्थापनातून सहकार क्षेत्राला योग्य दिशा दिली परंतु त्यांच्या परखड पारदर्शी स्वभावामुळे राजकारणात अनेकवेळा अपयश पत्करावे लागले तरी त्यांचे कार्य अतुलनीय असेच आहे.
    ग्रामीण शेतकरी असंघटित व दरिद्री असून त्याच्याकडून कोणताच आíथक लाभ होणार नसल्याने देशभरातील प्रसारमाध्यमाकडून त्यांच्या समस्यांना डावलले जाते तर दुसरीकडे केंद्र व राज्य शासन जमीन अधिग्रहण, जमीन कमाल ग्रहण मर्यादा, जीवनावश्यक वस्तू कायदा उत्पादित मालाचा भाव पाणी वाटप या संदर्भातील सर्व कायदे हे एकतर्फी शेतकऱ्यांवर लादलेले आहेत. त्यामुळे कृषिप्रधान असलेल्या या देशात शेतकरी सतत उद्ध्वस्त होत आहेत. या उपेक्षित शेतकऱ्याला कादंबरी व कविताच्या माध्यमातून कवी व लेखक यांना योग्य स्थान देऊन त्यांच्या समस्या वेशीवर टांगून न्याय देत असल्याचे प्रतिपादन श्री. कोल्हे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. चंद्रकांत अभंग, स्वागत अशोकराव रोहमारे, सूत्रसंचालन प्रा. डॉ. गणेश देशमुख यांनी केले, तर आभार विधिज्ञ संजीव कुलकर्णी यांनी मानले.

Story img Loader