उन्हाळ्याने होरपळलेल्या आणि मान्सूनची वाट पाहणाऱ्या नागपूरकरांना आज रात्री आलेल्या मान्सूनपूर्व रोहिणीच्या सरींनी दिलासा दिला. या पावसामुळे वातावरणातील काहिली काहिशी कमी झाली.
यावर्षीच्या उन्हाळ्यात नागपूरचा तापमापकाचा पारा ४७ अंश सेल्सिअस ओलांडून गेला होता. या उन्हाने नागरिक हैराण झाले होते. हल्ली एप्रिल आणि मे  नव्हे, तर जून महिन्याचाही बराच काळ उन्हाळाच जाणवत असल्याने याहीवर्षी तोच अनुभव येतो की काय, अशी भीती सर्वाच्या मनात होती. जून सुरू झाल्यानंतर आजच्या तिसऱ्या दिवशी दुपारीही जाणवण्यासारखे ऊन्ह होते.
तिकडे केरळमध्ये मान्सून दोन दिवसांपूर्वीच येऊन ठेपला असला तरी तो विदर्भापर्यंत येण्यास बराच वेळ असल्याची सर्वाना जाणीव आहे. या पाश्र्वभूमीवर आज रात्री साडेनऊच्या सुमारास शहराच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. अवचित गाठलेल्या या पावसाने रस्त्यावरील वाहतूक काही काळ थांबली आणि वाहनचालक व पादचारी यांना आडोसा शोधावा लागला. मात्र, शहराच्या सर्वच भागात हा पाऊस झाला नाही. पावसाच्या या सरींनी वातावरणातील उष्मा काहिसा कमी होऊन सुखद गारवा आला. या अनुभवामुळे यंदा मान्सूनही याच आठवडय़ात येऊन पोहोचण्याची आशा बळावली आहे. 

Story img Loader