विद्या बालनने ‘द डर्टी पिक्चर’मधील ‘बोल्ड’ भूमिका साकारल्यानंतर आपल्यात खूप बदल झाले आणि आता माझे करिअर ‘द डर्टी पिक्चर’ पूर्वी आणि नंतर असे विभागले गेले आहे, असे म्हटले होते.  कंगना राणावतही आता कदाचित असे म्हणू शकेल. ‘फॅशन’मधील ‘मॉडेल शोनाली’द्वारे आपल्या तडफदार अभिनयाने गाजलेल्या कंगनाला त्या पद्धतीची चांगली व्यक्तिरेखा नंतर फारशी मिळू शकली नाही. परंतु, ‘क्वीन’ने पुन्हा एकदा सर्व थरांतून चांगली दाद मिळत आहे.
बॉलिवूडमध्ये यशासारखे दुसरे काहीच नसते. उगवत्या सूर्याला दंडवत घालणे हाच इथला शिरस्ता आहे. त्यामुळेच कंगनाने आपल्या चित्रपटाचे यश आणि वाढदिवस असे दोन्ही दणक्यात साजरे केले. तिच्या यशस्वी भूमिकेचे कौतुक करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तमाम कलावंतांनीही तिच्या घरी धाव घेतली. आता आणखी स्त्री केंद्री व्यक्तिरेखा साकारण्याचे ठरवून कंगनाने विद्या बालनच्या पावलावर पाऊल ठेवायचे ठरविलेले दिसतेय. अल्लड, साधीभोळी तरुणी ते स्वतंत्र विचारांचे व्यक्तिमत्व असलेली परिपक्व तरुणी अशी भूमिका ‘क्वीन’मध्ये साकारल्यानंतर कंगना आता ‘दुर्गा रानी सिंग’, ‘रिव्हॉल्वर रानी’ असे चित्रपट करतेय. ‘क्वीन’चा अर्थ राणी आणि कंगनाच्या आगामी चित्रपटांच्या शीर्षकातही ‘रानी’ हे शब्द आहेत. हा निव्वळ योगायोग समजायचा की काय? सुजॉय घोषसारखा दिग्दर्शक ‘दुर्गा रानी सिंग’ करीत आहे. आतापर्यंत कंगनाने फक्त तरुणीच्या म्हणजेच तिच्या वयाच्याच व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. परंतु, आता ती ३५ वर्षे वयाची व एका १४ वर्षांच्या मुलीची आई साकारणार आहे. ही भूमिका तिची सर्वात आव्हानात्मक भूमिका ठरेल, असे म्हटले जाते.  एकुणातच ‘कंगना की गाडी तो निकल पडी’ असेच म्हणावे लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा