दारणा धरणातून पाणी सोडण्याविषयी स्थानिक नेत्यांच्या भूमिकेत एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दारणातील पाणी अडविण्यास स्थानिक शेतकऱ्यांना न्यायालयीन मनाई आहे. ही स्थगिती उठवून स्थानिक शेतकऱ्यांना पाणी द्यावे, त्याकरिता किमान १५ टक्के पाणी आरक्षित करावे, संकटसमयी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी केली आहे. मराठवाडय़ास पाणी दिल्यामुळे इगतपुरी तालुक्याच्या पाणी आरक्षण व नियोजनास कोणताही धक्का लागणार नसल्याचे काँग्रेसच्या आ. निर्मला गावित यांनी स्पष्ट केले. दारणातून तीन टीएमसी पाणी सोडले तरी जवळपास साडे तीन टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे स्थानिकांवर कोणताही अन्याय होणार नसल्याची त्यांची भूमिका आहे. माजी आमदार शिवराम झोले यांनी शासनाचा निर्णय तालुक्याच्या हिताचा असल्याचे नमूद करत भाम धरणाचे काम बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.