ज्ञानसंपन्न समाज निर्माण करण्यात ग्रंथालयांची भूमिका महत्त्वाची असून ही ग्रंथालये संपन्न झाली पाहिजेत. ग्रंथालयांच्या वाढीसाठी त्यात लोकांचाही सहभाग वाढला पाहिजे, असे प्रतिपादन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी दादर येथे केले.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ११५ व्या वार्षिकोत्सवात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.
शारदा मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ‘ज्ञानाधारित समाज आणि ग्रंथालये’ या विषयावर आपले विचार व्यक्त करताना डॉ. कोतापल्ले म्हणाले की, ‘गाव तेथे ग्रंथालय’ अशी योजना राबवून सार्वजनिक ग्रंथालयांची सांगड शाळांशी घालावी लागेल. भावनेपेक्षा बुद्धीला, विवेकाला आणि विचारांना जो समाज अधिक महत्व देईल त्या समाजाची अधिकाधिक उन्नती होईल. लोकशाहीतील महत्त्वाचे तत्त्व सहनशीलता हे आहे. सहनशीलतेत टीका सहन करून त्याला प्रगल्भपणे उत्तर दिले गेले पाहिजे. दुर्दैवाने आज बौध्दिक पातळीवर चर्चा न करता भावनिक पातळीवर लोकांना नेण्याचे काम सुरू आहे.
याच कार्यक्रमात डॉ. कोतापल्ले यांच्या हस्ते विशेष पुरस्कार तसेच ग्रंथालय सेवक आणि उत्कृष्ट ग्रंथालयांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. अभिनेत्री सुलभा देशपांडे यांना नटवर्य केशवराव दाते पुरस्कार तर मामा पेंडसे पुरस्कार श्री चिंतामणी संस्थेच्या ‘मायलेकी’ या नाटकासाठी संजय पाटील यांना प्रदान करण्यात आला. वि. ह. कुलकर्णी पारितोषिक प्रा. सुधाकर प्रभू यांना, सवरेत्कृष्ट संपादनाचा कवी प्रफुल्लदत्त पुरस्कार हरीष सदानी यांना तर वि. गो. खोबरेकर पुरस्कार डॉ. मििलद पराडकर यांना प्रदान करण्यात आला. सुलभा देशपांडे व संजय पाटील यांनी आपले मनोगत या वेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथसंग्रहालयाचे कार्यवाह कृष्णकांत शिंदे यांनी तर सूत्रसंचालन स्वप्नाली जाधव यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा