ठेकेदारांना सातत्याने मुदतवाढ आणि ठेक्यातील मूळ किमतीपेक्षा वाढीव रकमेचे वाटप करण्यात वाकबगार असणाऱ्या ठाणे महापालिकेतील अभियांत्रिकी विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा आणखी एक नमुना पुढे आला असून ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील ‘सॅटिस’ प्रकल्पावर छत उभारणीच्या कामाचा खर्च तब्बल तीन कोटी रुपयांनी वाढविण्यात आल्याने आता या छतासाठी तब्बल १४ कोटी १७ लाखाचा खर्च करण्यात येणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस असलेल्या बस डेकवर स्तंभ उभारून हे भलेमोठे छत उभारण्याचा तांत्रिकी आराखडा अभियांत्रिकी विभागाने तयार केला होता. त्यानुसार ११ कोटी रुपयांचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले होते. मात्र, हजारो टन वजनाच्या स्तंभाचा भार सॅटिस पुलास पेलवेल का, याचा कोणताही संरचनात्मक अभ्यास तज्ज्ञ म्हणविणाऱ्या अभियंत्यांनी केला नव्हता. मात्र, निविदा काढण्यापूर्वी हा अभ्यास करण्याचे शहाणपण अभियंत्यांना सुचले आणि सॅटिसचे नियोजित छत तब्बल तीन कोटी रुपयांनी महागले.
एखाद्या कामाचे मूळ अंदाजपत्रक तयार करायचे, त्यानंतर निविदा काढायच्या आणि प्रत्यक्षात काम सुरू झाल्यावर वाढीव रकमेचे प्रस्ताव मंजुरीसाठी मांडायचे असे प्रकार ठाणे महापालिकेत वारंवार पुढे येत आहेत. महापालिकेच्या निविदांमध्ये वाढीव कामाचे पैसे अदा करण्याच्या नियमाचा अंतर्भाव असला तरी सातत्याने असे प्रकार घडू लागल्याने अभियांत्रिकी विभागाचे नेमके नियोजन कुठे फसते, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या सॅटिस प्रकल्पावर छत उभारण्याचा प्रकल्पही अशाच वाढीव रकमेच्या मंजुरीमुळे भविष्यात वादग्रस्त ठरण्याची चिन्हे असून या छताचे काम तब्बल तीन कोटी रुपयांनी वाढविण्याची नामुष्की अभियांत्रिकी विभागावर ओढवली आहे. सॅटिसवरील बस डेकवर उभ्या रहाणाऱ्या प्रवाशांना ऊन, पावसाचा त्रास सहन करावा लागतो. खरे तर सॅटिस प्रकल्पाची उभारणी करताना याचा विचार होणे गरजेचे होते. मात्र, नियोजनाच्या आघाडीवर निष्क्रिय असलेल्या अभियंत्यांनी तो केला नाही. काही वर्षे उलटल्यानंतर छत उभारण्याचे ठरले आणि या कामासाठी महाराष्ट्र सरकारकडून पाच कोटी रुपये देण्याचे विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी दिले. प्रत्यक्षात दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ११ कोटी २० लाखाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. हे सगळे करत असताना सॅटिस पुलावर उभारण्यात येणाऱ्या हजारो टन वजनाच्या स्तंभाचा भार पुलास पेलवेल का याचा कोणताही विचार करण्यात आला नाही. निविदा काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना काहींच्या लक्षात ही बाब आली आणि अभियंता विभागाची धावपळ सुरू झाली. सॅटिस प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या संरचना सल्लागारांकडून अभिप्राय मागविण्यात आले असता त्यांनी असे स्तंभ बस डेकवरून उभारणे योग्य होणार नाही, असा स्पष्ट अभिप्राय दिला. या छतासाठीचे स्तंभ पुलाच्या पायापासून उभारले जावेत, असे सल्लागारांनी सुचविले. त्यामुळे या कामाचा मूळ खर्च १४ कोटी १७ लाखांच्या घरात पोहचला आहे. सॅटिस पुलास स्तंभांचा भार पेलवेल का, याची तपासणी करणे अतिशय प्राथमिक बाब असताना मूळ अंदाजपत्रक बनविताना याचा विचार का करण्यात आला नाही, असा सवाल आता उपस्थित होत असून यामुळे के.डी.लाला यांच्या विभागाचा नियोजनशून्य कारभार पुन्हा एकदा उघडा पडला आहे. यासंबंधी के.डी.लाला यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते मीटिंगमध्ये असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्याशी संपर्क केला असता माहिती घेऊन सांगतो, असे ठोकळेबाज उत्तर त्यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा