ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून मोठा गाजावाजा करत उभारण्यात आलेला सॅटिस प्रकल्प प्रवाशांसाठी खऱ्या अर्थाने सुखकर ठरावा यासाठी महापालिकेने उशिरा का होईना पावले उचलण्यास सुरुवात केली असून उन्हाचे चटके आणि पावसाचा मारा झेलत सॅटिसच्या डेक एरियावर टीएमटी बसच्या प्रतीक्षेत तासन्तास ताटकळत राहणाऱ्या प्रवाशांच्या डोक्यावर सुमारे १२ कोटी रुपयांचे अत्याधुनिक असे छत उभारण्याचा निर्णय अभियांत्रिकी विभागाने घेतला आहे. हे करत असताना सॅटिसच्या पादचारी पुलावरून रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी दोन ठिकाणी लिफ्ट बसविण्यात येणार असून पुलाच्या पन्नास पायऱ्या चढण्याचा मनस्ताप त्यामुळे टाळता येऊ शकणार आहे. हा प्रकल्प उभा करत असतानाच त्यावर छत उभारले जावे, असा प्रस्ताव होता. परंतु निधीअभावी तो प्रत्यक्षात आला नाही. अखेर तब्बल पाच वर्षांनंतर सॅटिसवर छप्पर उभे राहणार असल्याने प्रवाशांची मोठी मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
जुने आणि नव्या ठाण्यासाठी एकमेव रेल्वे स्थानक असल्यामुळे या स्थानकावर प्रवाशांचा मोठा भार पडतो. मध्य रेल्वेच्या एका अहवालानुसार ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सुमारे साडेसहा लाख प्रवाशांची ये-जा असते, तर महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार रेल्वे स्थानक परिसरात याहून कितीतरी अधिक संख्येने वाटसरू येत असतात. रेल्वे स्थानक परिसरात मोठय़ा संख्येने येणाऱ्या वाहनांवर उतारा म्हणून महापालिकेने काही वर्षांपूर्वी सॅटिस प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पामुळे या भागातील वाहतूक कोंडी सुटेल, अशी आशा बाळगण्यात येत होती. मात्र, हा प्रयत्न तितकासा यशस्वी ठरला नाही. पश्चिमेच्या धर्तीवर पूर्व भागातही सॅटिससारखा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अरुंद रस्ते, वाहनतळांचा अभाव, मोठय़ा प्रमाणावर झालेले अतिक्रमण त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील गर्दीवर उपाय शोधायचा असेल तर सॅटिससारख्या प्रकल्पाशिवाय पर्याय नाही, असे ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अभियंत्यांना वाटते.
सॅटिस सुसह्य़ करण्याचा प्रयत्न
सॅटिसमुळे या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात निकालात निघाला असला तरी या प्रकल्पाच्या उभारणीत काही मूलभूत चुका असल्यामुळे तो प्रवाशांना तितकासा सुसह्य़ नव्हता. रेल्वे स्थानकाच्या बाहेर टीएमटी बसेससाठी सॅटिसवर खास डेक एरिया तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी टीएमटीचे थांबे आणि निवारा शेड असले तरी गर्दीचे प्रमाण पाहता त्याच्या मर्यादा स्पष्टपणे दिसायच्या. रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर टीएमटी बस पकडण्यासाठी शेकडो प्रवाशांचे जथ्थे या थांब्याच्या दिशेने येतात. त्यातील काही मोजके प्रवासी वगळले तर बहुतांश प्रवाशांना ऊन, पावसाचा मारा झेलत बससाठी ताटकळत उभे राहावे लागते. मुसळधार पावसात तर बस पकडताना प्रवाशांची तारांबळ उडायची. हा प्रकल्प उभा करत असतानाच त्यावर छत उभारणे गरजेचे होते. मात्र, पैसे नसल्याने ते शक्य झाले नाही. अखेर प्रवाशांचा वाढता दबाव लक्षात घेता तब्बल ११ कोटी रुपये खर्च करून छत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून दोन ठिकाणी लिफ्टची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सॅटिसच्या पन्नास पायऱ्या चढून रेल्वे स्थानक गाठणे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिव्य ठरायचे. दरम्यान, येत्या पंधरवडय़ात यासंबंधीच्या निविदा काढण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

Story img Loader