शारिरीक दुर्बलतेमुळे खचून न जाता मायेची पाखर आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर आपणही सर्वसामान्य मुलांच्या तुलनेत कमी नाही पनवेलमधील रोटरियन्स ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल करणाऱ्या मुलांनी दाखवून दिले आहे. या खास लेकरांनी आपल्या अपंगत्वावर मात करून शिक्षण क्षेत्रात यशाचा झेंडा रोवला आहे. यातील अस्मिता वाणी हिने दहावीत  ८९ टक्के गुण मिळवून तर आकाश पाटील या विद्यार्थ्यांने चित्रकलेत नाव कमवत पदविकेचा अभ्यास सुरू केला आहे.
नवीन पनवेल येथे रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन ट्रस्टची या ‘खास लेकरां’ची निवासी शाळा आहे. २००० मध्ये डॉ. एन. सी. जनार्दन (ई.एन.टी.) यांच्या संकल्पनेतून या विद्यालयाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला डॉ. जनार्दन यांच्या घरात भरणारी कर्णबधिर मुलांची शाळा रोटरी क्लबच्या सहकार्यानंतर नवीन पनवेल येथील इमारतीत भरू लागली. सुरुवातीला चार विद्यार्थी असलेल्या या विद्यालयात आज १९ मुली आणि ३१ असे ५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
येथे विद्यार्थ्यांची राहण्याची सोय आहे. संस्थेच्या यशस्वी वाटचालीमुळेच सरकारच्या समाजकल्याण विभागाने तीन वर्षांनंतर या संस्थेला अनुदान सुरू केले. ट्रस्टच्या प्रभारी मुख्याध्यापिका शैला बंदसोडे आणि अधीक्षक सतीश माटेकर यांच्यासह येथे १४ शिक्षकेतर कर्मचारी येथे मुलांची काळजी घेतात. अपंगत्वावर मात करीत जिद्दीने ही मुले येथे चौथीपर्यंतचे शिक्षण घेतात.
सामान्यज्ञान ते चित्रकला असा सर्व प्रकारचा अभ्यास या मुलांना शिकवला जातो. यापकीच  अस्मिता वाणी ही एक विद्यार्थिनी आहे. सुरुवातीपासून अस्मिता आणि तिच्या पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे तिने दहावीत चांगले यश मिळवले, असे मुख्याध्यापिका शैला यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
अस्मिता, आकाशची भरारी
अस्मिताने चौथीतून शिक्षण रोटरी ट्रस्टमधून घेतल्यानंतर पुढील शिक्षण भिवंडी येथील नाकोडा कर्णबधिर विद्यालयातून घेतले. सध्या ती पनवेलमधील वि. खं. महाविद्यालयात अकरावीत शिकते. असाच जिद्दीचा प्रवास आकाश पाटील या विद्यार्थ्यांचा आहे.
सुरुवातीपासून त्याला चित्रकलेची आवड होती. याच्या या सुप्त गुणांना पालकांनी आणि शिक्षकांनी वाव दिल्यामुळेच तोही नवीन पनवेल येथील ऋषिकेश महाविद्यालयात आज एटीडीचे शिक्षण घेतोय.
अस्मिता आणि आकाशसारख्या मुलांसाठी हे ट्रस्ट हक्काचे व्यासपीठ बनले आहे. या ट्रस्टचे नेतृत्व संस्थापक रतनचंद करवा, सचिव अ‍ॅड. सतीश मनोहर, राजेंद्र ठाकरे, प्रकाश शृंगारपुरे, दिलीप अत्रे, सफुदीन वोरा, मनोज मुनोत, प्रमोद वालेकर आदींसह सर्व रोटरियन्स करत आहेत.