गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाजारपेठा गर्दीने फुलल्या असतानाच सोमवारी दुपारी सुमारे दोन तास बरसलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली. अनेक सखल भागात पाणीच पाणी झाले.
दुपारी शहरातल्या बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठय़ा संख्येने खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. दुपारी एकच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. तब्बल दोन तास पडलेल्या पावसाने नागरिकांची मोठी त्रेधा उडाली. विजेचा कडकडाट, वादळवाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक भागातील वीज गायब झाली. शिवाय सखल भागात पाणीच पाणी झाले. आंबेडकरनगर, श्रावस्तीनगर, जयभीमनगर, पिरबुऱ्हाणनगर, तरोडा नाका, दत्तनगर यासह जुन्या नांदेड शहरातल्या सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. सखल भागासह उच्चभ्रू वस्ती अशी ओळख असलेल्या वसंतनगर भागातील अनेक घरात पाणी शिरले होते. अनेक वसाहतीतील नाल्या तुंबल्याने मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झाले. अशा रस्त्यांमधून वाट काढताना वाहनचालकांनाही मोठी कसरत करावी लागली.

Story img Loader