राज्य सरकारने एस.टी महामंडळाला डिझेल खरेदीवर दिली जाणारी सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने एस.टी. महामंडळाला सबसिडी दरात डिझेल देणे बंद केले आहे. त्यामुळे आता एस.टी.ला आगारनिहाय खाजगी डिझेल-पेट्रोल पंपावरून एस.टी.त डिझेल घ्यावे लागत आहे. खाजगी डिझेल-पेट्रोल पंपावर शुक्रवारी एस.टी. महामंडळाच्या गाडय़ांची पहिल्यांदाच रांग लागलेली पाहून वाहनधारकांना कमालीचे आश्चर्य वाटले.
शासनाच्या या धोरणामुळे सरकारच्या तिजोरीत जवळपास दरमहा ३०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. यवतमाळ विभागात राज्य परिवहन महामंडळाच्या पुसद, वणी, यवतमाळ, पांढरकवडा, राळेगाव, दारव्हा, दिग्रस, उमरखेड आणि नेर, असे ९ आगार आहेत. या ९ आगारांमधून रोज ५९३ बसेस धावतात आणि त्या दररोज पावणे दोन लाख किलोमीटरची यात्रा करतात.
यवतमाळ जिल्ह्य़ात एस.टी. महामंडळाला दररोज ४० हजार लिटर डिझेलची आवश्यकता असते. यापूर्वी एस.टी. महामंडळाचे स्वत:चे डिझेल पंप आपापल्या आगारात असल्यामुळे तेथूनच एस.टी. गाडय़ांना डिझेलचा पुरवठा होत असे. आता मात्र खाजगी डिझेल-पेट्रोलपंपांवरून एस.टी.च्या गाडय़ा डिझेल घेत असल्याचे आगळेवेगळे दृश्य पहायला मिळत आहे. उल्लेखनीय म्हणजे, खाजगी क्षेत्रात डिझेलचा भाव प्रती लिटर ५३.२२ रुपये आहे, तर एस.टी. महामंडळासाठी हाच दर ६३.६६ रुपये आहे. म्हणजे एस.टी.ला १०.१४ रुपये जास्त दराने डिझेल खरेदी करावे लागत आहे.
राज्यात २४७ आगार, ५७८ बसस्थानके असून १५ हजार बसेस रस्त्यावर धावत आहेत. यवतमाळ जिल्ह्य़ात ९ आगार असून यवतमाळ ८५, पुसद ७०, वणी ५२, उमरखेड ५०, दारव्हा ५०, पांढरकवडा ५५, नेर ३५, दिग्रस ३५, राळेगाव ३२ आदी ४६४ बसेस आहेत.