परीक्षा अर्ज भरताना वाणिज्यच्या विद्यार्थ्यांची दमछाक
देशातील प्रतिष्ठित विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या कारभारातील घोळ संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून त्याचा नाहक जाच वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे. महत्वाची बाब म्हणजे, काही महाविद्यालयांनीही विद्यापीठाच्या कार्यशैलीचे अनुकरण करत विद्यार्थ्यांची तारांबळ उडवून दिल्याचे दिसत आहे. वाणिज्य शाखेच्या अंतिम परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरताना समस्त विद्यार्थ्यांची चांगलीच दमछाक झाली. शिवाय, मुदतीत शुल्कासह अर्ज जमा व्हावेत म्हणून विद्यार्थ्यांना कित्येक तास उन्हात ताटकळत राहावे लागले.
विविध अभ्यासक्रमांचे निकाल लावताना विद्यापीठाने अलिकडील काही वर्षांत काय काय गोंधळ घातला, ते सर्वश्रुत आहे. आता हा गोंधळ निकालापुरताच मर्यादित न राहता त्याचे क्षेत्र विस्तारू लागले आहे. परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी विद्यापीठाने सुरू केलेली ‘ऑनलाईन’ व्यवस्था विद्यार्थ्यांची डोकेदुखी ठरली आहे. कारण, विद्यापीठाचे संकेतस्थळ संगणकावर उघडता उघडता नाकीनऊ आल्याचे बहुतेकांकडून सांगण्यात आले. अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्यामुळे या व्यवस्थेत काही तांत्रिक दोष निर्माण झाले. परिणामी, इंटरनेट कॅफे वा तत्सम ठिकाणी एक अर्ज भरण्यासाठी एक ते दोन तासांचा अपव्यय करावा लागला. इतके द्राविडी प्राणायाम करूनही ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत योग्य पद्धतीने प्राप्त होत नव्हती, अशी तक्रार वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी ‘नाशिक वृत्तान्त’कडे केली आहे.
वाणिज्य शाखेच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांच्या अंतिम परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यात द्वितीय वर्षांसाठी अर्ज भरू इच्छिणाऱ्यांना अर्ज भरता भरता बराच मनस्ताप सहन करावा लागला. मुळात जो अर्ज ऑनलाईन केला, त्याची प्रिंट काढून तो शुल्कासह महाविद्यालयात जमा करावा लागतो. म्हणजे, संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरण्यामुळे काम वेगात होणे, हा उद्देशही सफल होत नसल्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केल्यास धनादेशाद्वारे ऑनलाईन अर्ज भरता येऊ शकतात. परंतु, असा विचार न करता समस्त विद्यार्थ्यांना पुन्हा महाविद्यालयात रांगेत उभे रहावे लागते. त्यात ऑनलाईन अर्ज भरण्याची विद्यापीठाची व्यवस्था कुचकामी ठरली. हजारो विद्यार्थी एकाचवेळी संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठी प्रयत्न करू लागल्याने या व्यवस्थेवर प्रचंड ताण आला असण्याची शक्यता आहे. याचाही विचार विद्यापीठाने अंतिम मुदत निश्चित करताना केला नसल्याचा विद्यार्थ्यांचा सूर होता.
केटीएचएम महाविद्यालयाने विद्यापीठाच्या कार्यशैलीचे अनुकरण केले. वाणिज्यच्या द्वितीय वर्षांसाठी बुधवार मुलांकरिता तर गुरूवार मुलींसाठी अंतिम मुदतीचा दिवस असल्याची माहिती महाविद्यालयाने मंगळवारी सायंकाळी एका नोटीसद्वारे दिली. सायंकाळी उशिरापर्यंत विद्यार्थी महाविद्यालयात नसतात. बुधवारी जेव्हा ते महाविद्यालयात दाखल झाले तेव्हा त्यांना परीक्षा अर्ज भरण्याची आज अखेरची मुदत असल्याचे समजले. त्यांची मग चांगलीच धावपळ उडाली. घरी जाऊन कागदपत्रे आणण्यापासून ते इंटरनेट कॅफेत रांगा लावण्यापर्यंतचे सोपस्कार पार पाडता पाडता दुपार टळून गेली. कसेबसे ऑनलाईन अर्ज भरून आलेल्या या विद्यार्थ्यांना कित्येक तास रांगेत उभे राहून अर्ज जमा करण्यासाठी कसरत करावी लागली. गुरूवार हा मुलींसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचा दिवस होता. या दिवशीही परिस्थिती ‘जैसे थे’ राहिली. इंटरनेट कॅफेवर बराच वेळ खर्च करून अर्ज भरणाऱ्या विद्यार्थिनींना नंतर तीन ते चार तास तो अर्ज व शुल्क जमा करण्यासाठी रांगेत उभे रहावे लागले. महाविद्यालयाने ऐनवेळी अंतिम मुदतीची माहिती दिल्यामुळे सर्वाची प्रचंड दमछाक झाल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे.
दरम्यान, या घोळासंदर्भात महाविद्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी एकाच दिवशी विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये म्हणून अशी नोटीस लावण्यात आल्याचे सांगितले. अंतिम मुदत उपरोक्त दिवशी नसली तरी विद्यार्थी संख्या अधिक असल्याने महाविद्यालयाने अर्ज भरण्यासाठी तशी मुदत दिल्याचे स्पष्टीकरण करण्यात आले. त्या दिवसानंतरही विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जातील, असे परीक्षा विभागाने म्हटले आहे. विज्ञान शाखेचे परीक्षा अर्ज भरण्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे.
एकाचवेळी शुल्क भरण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून वेगवेगळे दिवस निश्चित करून हे काम केले जात आहे. सव्र्हर बिझी असल्याने विद्यार्थ्यांना  इंटरनेटवर अर्ज भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाबही महाविद्यालयाने विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यामुळे कदाचित अर्ज भरण्यासाठी विद्यापीठ मुदत वाढवून देऊ शकते, असेही या विभागाकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा