कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर गोदावरी स्वच्छतेचा मुद्दा वारंवार चर्चिला जात असून संत, महंतांनी गोदावरीच्या सद्यस्थितीविषयी नाराजी व्यक्त केली असताना दुसरीकडे गोदावरी स्वच्छतेसाठी नगरसेवक विक्रांत मते यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ‘पाण्यावरील घंटागाडी’ या निर्माल्य संकलन योजनेस महापालिकेने स्थगिती देण्याचा अजब निर्णय घेतला. या निर्णयामुळे गोदापात्रात पाणवेली पुन्हा एकदा मूळ धरू लागल्याने परिणामी नदीवर हिरवा शालू व अस्वच्छता वाढल्याने मते यांनी स्वखर्चाने गोदापात्र स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे.
निर्माल्य संकलन करणारी बोट योजना नगरसेवक मते यांनी पुन्हा सुरू केली असून या बोटीव्दारे आनंदवलीपासून सावरकरनगपर्यंत नदीपात्रातील घाण जमा केली जाणार आहे. यावेळी दक्षता अभियानचे सदस्य तसेच बोट क्लबचे खेळाडू दोन बोटींसह उपस्थित होते. दोन वर्षांपूर्वी आनंदवली ते होळकर पूल या दरम्यान तीन बोटींव्दारे नदीपात्र स्वच्छ करण्याचा उपक्रम महानगरपालिकेने सुरू केला होता. यामुळे गोदापात्र स्वच्छ होण्यास मदत झाली होती. तीन वर्षांपूर्वी गोदावरी नदीमध्ये पाणवेलींचे जाळे तयार झाले होते. सर्वत्र दरुगधीयुक्त वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत विक्रांत मतेंनी दक्षता अभियानाच्या माध्यमातून सावरकरनगर परिसरातील नदीपात्रात एक किलोमीटर नदीपात्र स्वच्छ करण्याचा प्रयोग यशस्वी केला होता.
निर्माल्य संकलन बोटीव्दारे होळकर पूल ते आनंदवली या दरम्यान नदीपात्र स्वच्छ करण्याच्या या योजनेचे आयुक्तांपासून पालकमंत्र्यांपर्यंत सर्वानी कौतुक केले होते. तसेच नदीपात्र स्वच्छतेसाठी होणारा कोटय़वधी रुपयांचा खर्च वाचवून काही लाखांपर्यंतच्या खर्चात गोदापात्र स्वच्छ होऊ शकते हे सिद्ध झाले होते. परंतु अलीकडेच पालिकेने या योजनेस स्थगिती दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आयुक्तांनी ही योजना पुन्हा सुरू करून नदीपात्र स्वच्छ करण्यात पुढाकर घेण्याची मागणी दक्षता अभियानच्या वतीने मते यांनी केली आहे. पालिकेच्या वतीने पाण्यावरील घंटागाडीविषयी कधीही निर्णय होवो, परंतु आपण गोदावरी स्वच्छतेसाठी आनंदवली ते सावरकरनगर यादरम्यान सुरूवात करत असल्याचे मते यांनी सांगितले. शशिकांत दोनले, आंबादास तांबे, अनिल काकड, संजय बोडके, गौरव घोलप आदी यावेळी उपस्थित होते.

Story img Loader