विदर्भातील पारा रोज नवे उच्चांक नोंदवत असताना महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील वन पाहुण्यांना उन्हापासून दिलासा देण्यासाठी पिंजऱ्यांमध्ये कुलर लावण्यात आले आहेत. उन्हाळ्याची तीव्रता पाहता वन्यप्राण्यांना उष्माघात, गॅस्ट्रो आणि डायरिया होण्याची शक्यता लक्षात घेऊन दरवर्षी पिंजऱ्यातील हिंस्र प्राण्यांना कुलरच्या थंडाव्यात ठेवले जाते.
 प्राण्यांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी महाराजबागेचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांच्या नेतृत्त्वातील पशुवैद्यकांची खास चमू रोज देखभालीसाठी येत असून प्राण्यांच्या आहारावर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
उन्हाची तीव्र दिवसेंदिवस वाढत चालल्याने हिरव्या जाळ्यांची आच्छादने टाकण्यात आली आहेत. हरणांच्या कळपांना संरक्षण देण्यासाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. पिंजऱ्यात ठेवलेल्या वाघिणी, बिबट आणि अस्वलांना दुपारी उन्हाचा त्रास होऊ नये, यादृष्टीने डेझर्ट कुलर बसविण्यात आले असून त्यात पाणी टाकण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मानवाला उन्हाळ्यात जेवढी थंडाव्याची आवश्यकता भासते तेवढीच आवश्यकता प्राण्यांनाही भासत असल्याने ही खबरदारी घेतली जात असून नागपुरचा ४५ अंशाच्या वर गेला आहे. त्यामुळे अतिरिक्त खबरदारी आवश्यक असल्याचे डॉ. सुनील बावस्कर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
उन्हाळ्यात प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेताना त्यांना रोजच्या आहारात तसेच ग्लुकोजचे पाणी आणि ‘ड’ जीवनसत्वही दिले जात आहे. महाराजबाग प्राणिसंग्रहालयात चार पट्टेदार वाघ, आठ बिबट, एक काळी अस्वल, हरिण, सांबर, माकड आणि विविध प्रकारचे पक्षी ठेवण्यात आले आहेत. हिंस्र प्राण्यांच्या तेसच पक्ष्यांच्या पिंजऱ्यांभोवताल थंडाव्यासाठी हिरव्या जाळ्यांचे आच्छादन लावण्यात आले आहे. त्यामुळे थेट सूर्यकिरणांपासून पक्ष्यांचा बचाव करणे शक्य होत आहे. पिंजऱ्यांना वाळ्याच्या ताटय़ा लावण्यात आल्या असून रात्रंदिवस त्यावर पाणी शिडकले जात आहे. तसेच दुपारी कुलर सुरू ठेवले जातात. सकाळी आणि सायंकाळी वाघांना खुल्या पिंजऱ्यात सोडले जात असल्याने तेथील पाण्याच्या डबक्यात खेळण्याचा आनंद वाघ लुटताना दिसतात. जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना अशा उन्हाळ्याची सवय होऊन जाते परंतु, पिंजऱ्यातील प्राण्यांची मात्र काळजी घेणे भाग असते, याकडे डॉ. बावस्कर यांनी लक्ष वेधले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा